Breaking News

खोपोली नगराध्यक्षांच्या निवासाजवळ अनधिकृत बांधकाम, नागरिकांचा विरोध, कारवाई नाही

खोपोली : प्रतिनिधी

येथील नगराध्यक्ष सुमन औसरमल व नगरसेवक मोहन औसरमल यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, त्याबाबत तक्रार केल्यानंतरही त्या बांधकामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशा बांधकामांना कर्मचार्‍यांचे अभय असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी उघडपणे करीत आहेत. खोपोली नगर परिषद हद्दीतील तांबडी वासरं येथे नगराध्यक्षांचे निवासस्थान असून, त्यांच्या शेजारीच तेथील रहिवासी नदाफ यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे. सदरचे बांधकाम करताना कुठलीही परवानगी घेतली नाही मोजमाप नाही. सदर इसमाने तेथील रहिवाशांची वहिवाट असलेल्या जागेवरच घराचे बांधकाम केले आहे. याच जागेतून सांडपाण्याची पाईप लाईन जात आहे. त्यामुळे सदर बांधकामास रहिवाशांनी आक्षेप घेतला असून, याबाबत दोन महिन्यापूर्वीही नगर परिषदेकडे तक्रारीचे निवेदन दिले होते. दरम्यान, नगररचना विभागाने या बांधकामास हरकत घेत संबंधित इसमाच्या घरावर हरकत नोटीसही लावली. पण नदाप याने ती नोटीस फाडून प्रशासनाला एक प्रकारे आव्हानच दिले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सदरचे बांधकाम नगर परिषद प्रशासनाने तोडून वहिवाट मोकळी करून द्यावी अशी मागणी येथील रहिवाशांच्या वतीने अशोक त्रिवनूर यांनी केली होती. तसेच सदरचे बांधकाम त्वरित न हटवल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची पत्रही त्यांनी दिले आहे. नगर परिषद प्रशासनाचा मनाई हुकूम असतानाही नदाफ याने बांधकाम सुरू ठेवले असून, त्याला कोणा बड्या नेत्याचा किंवा प्रशासनातील कर्मचार्‍यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका रहिवासी व्यक्त करीत आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply