Breaking News

भीमाशंकरला जाणारा शिडी घाट बंद

कर्जत : बातमीदार

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे ट्रॅकिंग करीत जाण्यासाठी ट्रेकर्स कर्जत तालुक्यातून असलेल्या पायवाटेने जातात. या पायवाटेतील आव्हानात्मक असलेला शिडी घाट या वर्षी बंद झाला आहे. दरम्यान, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने शिडीघाट बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेल्या भीमाशंकरला जाण्याकरिता कर्जत तालुक्यातील खांडस येथून दोन मार्ग आहेत. त्यापैकी शिडी घाट मार्ग थोडा अवघड आहे. खांडस भागातील अंभेरपाडा बेलाचीवाडी येथून पायवाटेने गेल्यानंतर शिडी घाटाचा रस्ता सुरू होतो. एक 25 फूट उभे कातळ चढून जावा लागणारा शिडी घाट हा भीमाशंकर अभयारण्य फिरण्यासाठी येणार्‍या ट्रेकर्सचा आवडीचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून असलेली या मार्गावरील लाकडी शिडी बदलून त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावल्याने हा धोकादायक मार्ग थोडा सोपा झाला होता, मात्र गेल्या काही दिवसांतील मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍याने शिडी घाटातील काही प्रमुख शिड्यांपैकी एक मुख्य लोखंडी शिडी कोसळली आहे. त्यामुळे या वेळी ट्रेकर्सना शिडी घाटातून भीमाशंकर गाठता येणार नाही. शिडी घाटातील लोखंडी शिड्या तुटून गेल्याने ट्रेकर्स आणि भाविकांना आता गणपती घाटातून भीमाशंकर गाठावे लागणार आहे.

श्रावण महिन्यात कर्जत तालुक्यातील खांडस येथून चालत भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि ट्रेकर्स जातात, मात्र या मार्गावरील लोखंडी शिड्या तुटल्याने शिडी घाटातून भीमाशंकरला जाणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिडी घाट बंद असल्याचे जाहीर केले आहे.

-डॉ विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड

खांडस येथे फलक लावून शिडी घाट बंद असल्याची माहिती देण्यात यते आहे, या फलकांवर शिडी घाटातील मोडलेल्या लोखंडी शिड्यांचे फोटो मोठ्या आकारात टाकले आहेत. ते बॅनर अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवरही लावले जाणार आहेत.

-वैशाली परदेशी, प्रांत अधिकारी, कर्जत

तलाठी आणि मंडळ अधिकारी, तसेच निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना शिडी घाटाकडे पाठवले आहे. ते तेथील परिस्थिती पाहून तत्काळ जिल्हा प्रशासनाला अहवाल देणार आहेत.

-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply