शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात आली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका…
आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी बनावट कर्जखाती निर्माण करणे, त्या खात्यातील पैसे बेकायदेशीररीत्या इतरत्र वळविणे आणि एवढे होऊनही काहीच झाले नाहीत असा आव आणत आपणच पैसे परत करणार आहोत, असा बिनबुडाचा दावा करणारे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या या अगाध भूमिकेबाबत पनवेलमधील कायद्याचे ज्ञान असलेल्या मंडळींकडून आणि सर्वसामान्य जनतेकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोरगरीब व सामान्य नागरिक, व्यावसायिक, ग्रामपंचायती, सार्वजनिक संस्था, सरकारी व निमसरकारी आस्थापने यांना आपले आर्थिक व्यवहार सुकरपणे करता यावेत यासाठी बँकांची निर्मिती करण्यात आलेली असते. या बँकांवर विश्वास ठेवून जनता बिनदिक्कतपणे आपले कष्टाचे पैसे बँकांमध्ये गुंतवते. है पैसे सुरक्षित आहेत, असे वाटून जनता बिनघोरपणे जगत असते, मात्र या गोष्टीला नेमका तडा देण्याचे काम पनवेल येथे मुख्य कार्यालय असलेल्या आणि 17 शाखा असणार्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने केले आहे.
1996 साली स्थापन झालेल्या कर्नाळा बँकेला 12 वर्षांतच ग्रहण लागले आणि सर्वसामान्य ठेवीदार व खातेदारांच्या मागे संचालक मंडळाचे राहू-केतू हात धुवून मागे लागले. ही बाब 31 मार्च 2018च्या आरबीआयच्या लेखा परीक्षण अहवालात उघड झाली. या संपूर्ण प्रकरणाची राज्याच्या सहकार खात्यानेही चौकशी केली. या चौकशीत प्रथमदर्शनी 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपयांचा घोटाळा असल्याचे उजेडात आले.
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम संचालक आणि 63 बनावट कर्जदारांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यात सहकार खात्याने घेतलेला सुमारे 100हून अधिक बनावट कर्जदार आणि संचालकांचा जबाब अत्यंत वाचनीय, हास्यास्पद व गमतीशीर आहे. या जबाबापैकी शेकापचे विद्यमान नगरसेवक प्रमोद बुधाजी भगत यांनी सहकार खात्याला दिलेल्या जबाबातील महत्त्वाच्या बाबी ‘रामप्रहर’च्या वाचकांसमोर मांडत आहोत.
नगरसेवक प्रमोद बुधाजी भगत आपल्या जबाबात म्हणतात…‘
महोदय,
आपलेकडील वरील संदर्भीय पत्रानुसार पुढीलप्रमाणे खुलासा करीत आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब यांच्या विचाराने या विभागातील खेळाडूंना चांगले मार्गदर्शन, संधी व साधने निर्माण करून ऑलिम्पिकपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना करण्यात आली, तसेच या विभागातील गोरगरीब पालकांच्या पाल्यासाठी आधुनिक दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण कमीत कमी खर्चात देण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गेला 15 वर्षांत समाजाच्या सर्वांगीण विकासाचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. वरील दोन्ही संस्थांना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे वेळोवेळी निधीची कमतरता जाणवत होती. म्हणून बँकेचे अध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार माझ्या नावाने मे. अॅपेस टेले कॉम्प्युटर, ओडी. खाते क्र. 12 हे कर्ज खाते सुरू केले व या खात्यातून जसजशी वरील दोन्ही संस्थांना गरज भासली, तसेतसे निधी कर्ज खात्यातून वळते करण्यात आला आणि जेव्हा जेव्हा वरील दोन्ही संस्थांकडे निधी उपलब्ध झाला तेव्हा तेव्हा माझ्या कर्ज खात्यात तो निधी भरण्यात आला.
वरील दोन्ही संस्थांकडे जसजसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे तो निधी माझ्या कर्ज खात्यात वळता करून सदरचे कर्ज खाते बेबाक करण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब यांनी सांगितले म्हणून माझ्या ओडी खाते क्र. 12 वर असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड करण्याची जबाबदारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री. विवेकानंद पाटील साहेब यांनी घेतलेली आहे.
आपला विश्वासू,
(श्री. प्रमोद बुधाजी भगत)
नगरसेवक प्रमोद बुधाजी भगत यांच्या या जबाबानंतर
कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, शेकाप नेते विवेक पाटील म्हणतात..
महोदय,
श्री. प्रमोद बुधाजी भगत, मु. नवापाडा, पो. कळंबोली, ता. पनवेल यांचे ओडी कर्ज खाते क्र. 12 या कर्ज परतफेडीबाबत सदर अर्जदाराने दिलेल्या उत्तरास मी संमत आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी व कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थांमध्ये निधी जसाजसा उपलब्ध होईल तो निधी सदर खातेमध्ये वळता करून सदर कर्ज खाते बंद करण्याची जबाबदारी माझी आहे. वरील कर्ज खात्यांतून वैयक्तिक माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांकरीता सदर कर्ज रकमेचा कोणताही विनियोग केलेला नाही
कळावे,
आपला विश्वासू
(श्री. विवेकानंद शंकर पाटील)
उपरोक्त बनावट कर्जदारांनी अशाच प्रकारचे जबाब सहकार खात्याला दिले आहेत आणि या कर्जाला आपण जबाबदार असल्याची हमी विवेक पाटील यांनी दिली आहे, तसेच ही बनावट कर्ज खाती केवळ विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा स्पोर्ट्स क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या स्वत:च्याच संस्थांच्या कामासाठी बेकायदेशीररित्या वापरण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्व घोटाळ्याचा आणि गैरव्यवहाराचे उत्तर विवेक पाटील यांना पोलीस ठाण्यात, न्यायालयात आणि कोठडी दिल्यानंतरही द्यावे लागणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …