राष्ट्रवादी, शेकापला तडाखा; आठपैकी थेट सरपंचपदावर सेनेचे सहा उमेदवार विजयी
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 25) झालेल्या मतमोजणीत आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी आणि शेकापला प्रत्येकी एक सरपंचपद मिळाले आहे. तालुक्यातील ममदापूर, चिंचवली, किरवली, हालीवली, पळसदरी, भालीवडी, खांडपे व सावेळे या आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान झाले. सोमवारी कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. त्यात चिंचवली, हालीवली, किरवली, भालीवडी, पळसदरी आणि सावेळे या सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. ममदापूरच्या थेट सरपंचपदी शेकापचा उमेदवार विजयी झाला असला तरी तेथे त्या पक्षाला बहुमत मिळाले नाही. हालीवली, किरवली, पळसदरी, भालीवडी, सावेळेमध्ये शिवसेनेकडे थेट सरपंचपद आणि बहुमतदेखील आहे.