पनवेल : रामप्रहर वृत्त – दीप अमावस्येच्या निमित्ताने गुरुवारी यूईएस स्कूलमध्ये मोठया उत्साहात ‘दीपपूजा उत्सव’ साजरा करण्यात आला.
दीपपूजेसाठी माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणले होते. शाळेच्या व्हरांडयातील एका टेबलावर समया, लामणदिवे, पणत्या, निरांजने असे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी दिवे मांडून सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशामुळे केलेली सजावट डोळ्यांना अधिकच नयनरम्य भासत होती. तसेच दोन रांगोळी चित्रेही सर्वांचे लक्ष वेधत होते. संगीत शिक्षिका किर्ती गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी सुंदर असे प्रार्थना गीत सादर केले. यु.ई.एस. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी दीपप्रज्वलन केले. त्यांच्यासोबत मानद सचिव आनंद भिगांर्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, माजी प्राचार्या व सदस्या नेहल प्रधान, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स, सर्व पी. टी. ए. मेंबर्स, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. दीप अमावस्येच्या निमित्ताने सर्वत्र ज्ञानाची ज्योत पेटवून, जगभरातील अज्ञानरुपी अंधकार दूर व्हावा, यासाठी सर्वानी मनोभावे प्रार्थना केली.