Breaking News

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 11 ऑगस्टपर्यंत बंद

पुणे : प्रतिनिधी

घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. 11)  बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणार्‍या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 3) रात्री मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे. तेव्हापासून पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दोन्ही शहरांदरम्यान धावणार्‍या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी व इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या धावलेल्या नाहीत, तसेच प्रगती व डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या यापूर्वीच रद्द करण्यात आल्या होत्या. या मार्गावर एकही रेल्वेगाडी न धावल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच आता रेल्वेकडून रविवारपर्यंत या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबईला ये-जा करण्यासाठी एसटी बस तसेच खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. इंटरसिटी गाड्यांप्रमाणे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्याचा आणि काही गाड्या अंशत: रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

रद्द न केलेल्या मुंबईच्या दिशेने जाणार्‍या काही रेल्वेगाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत, तर काही गाड्यांना दौंड ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आले आहे. या गाड्या पुणे किंवा दौंड स्थानकातून नियमित वेळेनुसार सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply