पनवेल : वार्ताहर
कळंबोलीतील सेक्टर 3 ई येथील मोकळ्या जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग अचानकपणे कोसळल्याने परिसरातील रहिवाशांंमध्ये घबराटीचे वातावरण होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे बाजूच्या सोसायटी आणि सिडकोच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही सिडकोकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. वसाहतीत करवली चौकाच्या बाजूला रिधिमा सोसायटी आहे. ही इमारत 2011 पासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे डागडुजी आणि दुरुस्ती करण्यात आली नाही, तसेच देखभालीचाही विषय राहिला नाही. परिणामी ही इमारत धोकादायक झाली होती. दरम्यान, बुधवारी रिधिमाचा काही भाग कोसळला. त्याचबरोबर गुरुवारी सकाळीसुद्धा आणखी काही भाग पडला. दरम्यान, महापालिकेने पाठीमागे राहत असलेल्या सिडकोची घरे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाली केली आहेत. बाजूच्या कृषिधन सोसायटीला सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, करवली चौकातून फायर ब्रिगेडकडे जाणारी मार्गिका वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी अंकुश खेडकर हे घटनास्थळी दाखल झाले.