Breaking News

उरणचे शेतकरी फळपिकांकडे आकर्षित

चिरनेर : प्रतिनिधी

पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्‍या फळपिकांकडे उरण विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. फळझाडांच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाचा स्रोत अधिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षापासून फळपीक लागवड क्षेत्र उरण तालुक्यातील चिरनेर भागात विस्तारात आहे. कोकणची माती ही फळपिकांसाठी उत्तम असल्याने पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीचे बांध, पडीक माळराने यांच्यावर फळपीक लागवड क्षेत्र वाढविण्याकडे शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. कोकणपट्टीत फळपिकांमध्ये सर्वोत्तम ठरलेला हापूससह केशर, आंबा, पेरू, जांभूळ, पपई स्ट्रॉबेरी या फळझाडांना पोषक हवामान आहे. उरण तालुक्याचा विचार केल्यास डोंगरप्रवण क्षेत्रातील सीमावर्तीय डोंगराळ भाग फळपीक लागवडीसाठी सर्वोत्तम आहे. रानसई, आक्कादेवी या धरणांना येऊन मिळणारे ओढे, नाले, झरे या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतचा वापर या फळपीक लागवड योजनेत केल्यास आता उत्पादन देणारे एक हजार हेक्टर फळपीक वाढवून ते पाच ते 10 हजार हेक्टर पर्यंत जाऊ शकते. शेतकर्‍यांना पडीक, डोंगराळ माळराने समुह शेतीसाठी दिल्यास मुंबईसारख्या महानगरीला थेट फळांची आवक करण्यास उरण तालुक्यातील फळपीक क्षेत्र उपयुक्त ठरणार आहे. फळशेतीसाठी उरण तालुक्याचे कृषी अधिकारी के. एस. वसावे, मंडळ कृषी अधिकारी क्रांती चौधरी, पर्यवेक्षक प्रकाश कदम, प्रदीप जाधव, कृषी सहाय्यक अधिकारी, डी. टी. केणी, संगीता पाटील, कमळाकर पाटील, श्री. भजनावळे, विभावरी चव्हाण, शीतल गर्जे, सौ. पानसरे, तसेच विभागातील शेतकरी जनार्दन केणी, कृष्णा केणी, संतोष चिर्लेकर, वसंत चिर्लेकर, महेंद्र मोकल, दत्तात्रेय मोकल, वसंत मोकल, धनंजय गोंधळी, दत्तात्रेय म्हात्रे, धनाजी नारंगीकर, दामोदर चौलकर आदी यासाठी प्रयत्नशील आहेत; तर शेतकरीवर्ग अनुकूलता दर्शवित आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply