Breaking News

आजपासून बारावीची परीक्षा; राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज

पुणे : प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख पाच हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण 15,05,027 विद्यार्थ्यांपैकी 8,43,552 विद्यार्थी, तर 6,61,325 विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण 3,036 परीक्षा केंद्र आहेत. या वर्षीच्या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
मोबाइल बंदी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाइल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, तर गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र विद्यार्थ्यांना मोबाइलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply