![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/08/koyna-dam-1024x585.jpg)
सातारा : प्रतिनिधी
कोयना धरणाच्या क्षेत्रात यंदा विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये कोयना धरणातील पाण्याचा साठा तब्बल 50.63 टीएमसीने वाढल्याचे समोर आले आहे. याची टक्केवारी काढायची झाल्यास अवघ्या पाच दिवसांत धरणात 48.10 टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या वरच्या क्षेत्रात विक्रमी पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे.
कोयना धरणाच्या इतिहासात 1961 सालापासूनची ही पाण्याची उच्चांकी आवक आहे. त्यामुळे धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. परिणामी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सरकार केवळ धरणातून होणार्या पाण्याच्या विसर्गाची आकडेवारी देते, पण धरण व्यतिरिक्त ओढे नाले यातून येणार्या पाण्याचा विचार होताना दिसत नाही.
दुसरीकडे कोयना धरणाचा विसर्ग कमी केला तरी शिरोळ भागातील पाण्याची पातळी कमी झालेली नाही. याउलट कालच्यापेक्षा आज पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग खरंच वाढवण्यात आला का, याविषयी शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.