पर्यटकांची गैरसोय, मेरीटाइम बोर्डाचे लाखो रुपयांचे नुकसान
मुरूड : प्रतिनिधी
ऐतिहासीक जंजिरा किल्ल्याला भेट देणार्या पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने अडीच कोटी रुपये खर्च करून खोरा बंदरात संरक्षक भिंत व वाहनतळ बांधले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे वाहनतळ वापराविना पडून आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे शिवाय मेरीटाइम बोर्डाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
समुद्रात असलेला जंजिरा किल्ला पहाण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. शिडाच्या 13 होड्या आणि दोन मशीन बोटीद्वारे खोरा बंदरातून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर पोहचवण्याचे काम केले जाते. हा जलदुर्ग पहाण्यासाठी येणार्या पर्यटकांना आपली वाहने खोेरा बंदरात उभी करावी लागतात. त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने दोन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्च करून खोरा बंदरात संरक्षक दगडी भिंत व वाहनतळ उभारले आहे. मात्र हे वाहनतळ अद्यापही पर्यटकांना वापरू दिले जात नाही. त्यामुळे पर्यटकांच्या गाड्या अजूनसुद्धा खोरा बंदराच्या प्रवेशद्वाराबाहेर लावल्या जात आहेत. वाहनतळ वापरू दिले जात नसल्याने इथे येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.
वाहनतळाचा ठेका मागील दोन वर्षांपासून देण्यात न आल्याने मेरीटाइम बोर्डाचेसुद्धा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र संबंधीत अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.