नागोठणे : प्रतिनिधी
येथील प्रथितयश व्यावसायिक तथा भाजपचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते सचिन मोदी यांची भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र पेण येथील कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोदी यांना देण्यात आले.
सचिन मोदी यांचा जनसंपर्क सर्वोत्तम असून नागोठणेसह विभागात तळागाळापर्यंत पोहोचवून भाजप अजून बळकट करण्याची जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील, असा विश्वास या वेळी आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.
नागोठणेसह विभागात आपला पक्ष बळकट होत चालला असून स्थानिक नेतेमंडळींचे पक्षात मोलाचे सहकार्य लाभत असल्याने नागोठण्यात आपला पक्ष एक नंबरवर आणणे, हेच माझे पुढील ध्येय असेल, असा विश्वास सचिन मोदी यांनी या वेळी स्पष्ट केला. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजपचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, ज्येष्ठ नेते मारुती देवरे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय गोळे, नागोठणे विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर शिर्के, राजेंद्र लवटे, सिराज पानसरे, रामचंद्र देवरे, गौतम जैन, नारायण सुटे, शैलेश रावकर आदींसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.