अलिबाग : प्रतिनिधी
येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच रुग्णवाहिका सागरी बोटीची (बोट अॅम्ब्युलन्स) सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासनाकडे पाठविला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांना मुंबईत योग्य वेळेत चांगले उपचार मिळू शकतील.
जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथूनही पुढील उपचारासाठी रुग्ण येतात. या ठिकाणी येणारे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागते. रायगड सरकारी रुग्णालयातून मुंबईत अधिक उपचारासाठी दिवसाला किमान चार अत्यवस्थ रुग्ण पाठवले जातात. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे काही वेळा रुग्ण दगावतात. रुग्णांना कमी वेळेत मुंबईत पोहोचता यावे व त्यांचे प्राण वाचावेत म्हणून सागरी मार्गाने जाणार्या बोट अॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव तयार आहे.
या अॅम्ब्युलन्स बोटीत मेडिकल रूम, मेडिकल स्टोअर, ऑक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोअर, वॉश रूम, टॉयलेटची सुविधा असणार आहे. त्याचप्रमाणे ही बोट संपूर्ण वातानुकूलित असेल. किमान सात व्यक्ती सामावू शकतील अशा या बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसही बसविण्यात येणार असून, जनरेटरही असणार आहे. अलिबागहून रुग्णांना मांडवा जेटीवरून बोट अॅम्ब्युलन्सने गेट वे ऑफ इंडिया येथूून मुंबईतील रुग्णालयात सोडण्यात येईल. बोट 12 नॉटिकल माईलने पाण्यातून जाणार असल्याने मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया हे 25 किमीचे अंतर अवघ्या एका तासात पार होईल. त्यामुळे रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेत मिळू शकणार आहेत.