Breaking News

वाशीत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योगदौड ; जागतिक स्तरावरील आरोग्यदायी उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

केंद्रीय आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 ऑगस्टपर्यंत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योगदौड या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिडकोचे अध्यक्ष तथा आयोजन कमिटीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी

(दि. 12) बेलापूर येथील सिडको विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस आमदार मंदाताई म्हात्रे, आयोजन कमिटीचे सचिव डॉ. विष्णू बावणे, डॉ. संजीव यादव, डॉ. निनाद साठे, डॉ. आशिष पुंडे हेही उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे सांगितले की, वाशी येथील सिडको एक्झिबिशन व कन्व्हेंशन सेंटर येथे होणार्‍या या चार दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले असून, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे रविवारी (दि. 18) सकाळी 6 वाजता सीवूड्स येथील गणपत तांडेल मैदान येथे आयोजित योगदौडचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीविषयी 50पेक्षा अधिक कार्यशाळा व 10 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यविषयक प्रदर्शन, मोफत महाआरोग्य शिबिर व चर्चासत्र होणार आहेत, असे सांगून या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 

डॉ. विष्णू बावणे यांनी म्हटले की, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार्‍या चर्चासत्रात शेतकरी व औषधी वनस्पती व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन, परिसंवाद व कार्यशाळेस देश-विदेशातून 10 हजार डॉक्टरांची व वैद्यकीय विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित असून, दररोज 50 हजार नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची या कार्यक्रमास भेट अपेक्षित आहे.

माझ्या मतदारसंघात हा जागतिक स्तरावरील कार्यक्रम होणार आहे. त्याच्या यशस्वितेसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून, या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर व अन्य आयोजक सहकार्‍यांचे आभार मानते.

-आमदार मंदाताई म्हात्रे

धावपळीच्या काळात आहारात बदल होत चालला आहे. त्याचबरोबर वाढते प्रदूषण पाहता आरोग्याची काळजी कटाक्षाने घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात जनजागृती झाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम होणार आहे. -डॉ. संजीव यादव

Check Also

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्री

नवी मुंबई ः बातमीदार सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर माझी …

Leave a Reply