पोरबंदर ः वृत्तसंस्था
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने मोठी कारवाई करीत भारतीय हद्दीत घुसणार्या नऊ अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तस्कर सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतात येत होते. हे हेरॉइन 500 कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे, मात्र सर्व पुरावे नष्ट व्हावेत म्हणून बोटीतील कर्मचार्यांनी बोटीला आग लावून ती उद्ध्वस्त केली, पण गुजरात एटीएसच्या अधिकार्यांनी बोटीमधील हेरॉइनने भरलेल्या चार पिशव्या जप्त करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांची तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार परिसरात पाळत ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे अमली पदार्थ तस्करांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने अमली पदार्थ तस्करांविरोधात केलेली ही कारवाई सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. या कारवाईबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोट्यवधी रुपये किमतीचे अमली पदार्थ घेऊन एक बोट पोरबंदरजवळ भारतीय सागरी हद्दीत शिरली. भारतीय तटरक्षक दलाला या बोटीबाबत संशय आला. त्यानंतर वेळ न दवडता भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करीत या बोटीला चोहोबाजूंनी घेरले. या कारवाईदरम्यान बोटीतील नऊ तस्करांना ताब्यात घेण्यात आले, मात्र आता आपण संकटात सापडल्याचे लक्षाच आल्याने बोटीत असलेल्या कर्मचार्यांनी बोटीला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गुजरात एटीएसच्या अधिकार्यांनी बोटीमधील हेरॉइनने भरलेल्या चार पिशव्या जप्त करण्यात यश मिळवले. दरम्यान, हे 100 किलो अमली पदार्थ देशभरातील विविध राज्यांमध्ये पाठवण्याची तस्करांची योजना होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.