आरपीआयच्या जगदीश गायकवाड यांची माहिती
पनवेल ः वार्ताहर
माझ्यासह माझी पत्नी, माझी बहीण व मुलांची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठीच काही विरोधकांनी माझ्या मुलांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध कळंबोली व परिसरातील नागरिक व माता भगिनींच्या साथीने भव्य मोर्चा येत्या 16 तारखेला काढणार असल्याची माहिती आरपीआयचे कोकण प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष किशोर गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जगदीश गायकवाड यांनी सांगितले की, कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये दि. 4 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्यांबाबत तपासनिक अंमलदार यांनी योग्यरित्या चौकशी न करता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची चौकशी न करता केवळ फिर्यादी व त्यांच्या साथीदार यांच्या दबावाखाली येवून चुकीचा तपास करून माझ्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रोडपाली व कळंबोली येथील नागरिकांचा मोर्चा काढला जाणार आहे. या घटनेत फिर्यादी यांच्या तक्रारीप्रमाणे 3 ऑगस्ट रोेजी रात्री 11.00 वाजता कळंबोली येथील गिरीराज बार अॅण्ड रेस्टारंट येथे मारहाण झाल्याबद्दल तक्रार नोंदविली आहे. जखमी हा स्वतः मद्य सेवन करून उलट सिद्धांत जगदीश गायकवाड यांना शिवीगाळ करीत होता. परंतु ही बाब प्रथम खबर अहवाल यात नमूद केलेली नाही. जखमी हे एमजीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेले असता तेथील डॉक्टर यांनी जखमी यांची वैद्यकीय तपासणी करताना मद्य प्राशन केल्याबाबत अहवाल दिलेला होता. हा अहवाल तपासनिक अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे. परंतु या अधिकार्यांनी अहवालाचे अवलोकन न करता गुन्ह्यामध्ये भादवि कलम 326 हे दि. 5 ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार वाढविण्यात आलेले आहे व पुन्हा गुन्ह्याची सखोल चौकशी न करता भादवि कलम 307 वाढविण्यात आले आहे. हे सर्व राजकीय द्वेषापायी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साक्षीदारांकडे माहिती घेतल्यास खरी घटना उघडकीस येईल. या बाबत स्पर्श हॉस्पिटल येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणी जगदीश गायकवाड यांनी केली आहे. त्या प्रमाणे जखमी इसमाने विमा कंपनीकडे इन्शुरन्स क्लेम केला असता हा क्लेम चोलामंडलम या कंपनीच्या अभिप्रायनुसार स्वतःहून जखमा करून घेतल्याबाबत अभिप्राय दिलेला आहे. तरी या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त, उपायुक्त यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला कळंबोली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याशिवाय गत्यंतर नाही, असा इशारा सुद्धाआरपीआयचे कोकण प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी दिला आहे.