Breaking News

रायगड जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतीला लाल कार्ड नाही

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत मिळाल्यामुळे दिले जाणारे लालकार्ड यंदा एकाही ग्रामपंचायतीला मिळालेले नाही. 62 ग्रामपंचायतीमध्ये मध्यम जोखमीचे स्त्रोत आढळले, त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले. सुरक्षित स्त्रोत असलेल्या 746 ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य रोगांच्या प्रादूर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी  व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोनदा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणानंतर शुद्ध पाणीपुरवठा असलेल्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते, तर दूषित पाणीपुरवठा असलेल्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. गावामध्ये पाण्याचे स्त्रोत दूषित नाहीत, परंतु गावात अस्वच्छता आढळते, त्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते. यंदा पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील 808 ग्रामपंचायतींमधील जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तीव्र जोखमीचा एकही  स्त्रोत आढळला नाही. पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत नाहीत म्हणून एकही ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आलेले नाही. पाच  हजार 421 स्त्रोत सौम्य जोखमीचे आढळले. 62 ग्रामपंचायतीमध्ये मध्यम जोखमीचे स्त्रोत आढळले. त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले. सुरक्षित स्त्रोत असलेल्या 746 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. जेथे मध्यम जोखमीचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत, हे स्त्रोत सौम्य जोखमीचे करावेत, अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे विहिरी, विंधण विहिरी, तसेच नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये पुराचे मिसळून हे पाणी दूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर अशा जलजन्य रोगांची साथ पसरण्याची भीती आहे. त्याप्रमाणे कीटकजन्य रोगांचीही साथ पसरू शकते. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणार्‍या जलजन्य आजारावर प्रतिबंध ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्था यांना रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंके यांनी दिल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply