Breaking News

रायगडात पावसाचे धुमशान कायम

मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर पाणी; आपटा गावात शिरले नदीचे पाणी

अलिबाग : रामप्रहर वृत्त
गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून पाताळगंगा व कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जुन्या मुंबई- पुणे महामार्ग येत सुमारे 1 किमीचा महामार्ग पाण्याखाली गेला. यामुळे येथील वाहतूक रोखण्यात आली होती. आपटा गाव येथील नदीच्या काठावर असल्याने मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरले आहे. पेण तालुक्यातील तालुक्यातील बेलवडे येथील दौलत माया पवार (वय 60) हे मंगळवारी (दि. 5) मासेमारी करण्यासाठी गेले असता पावसाच्या पाण्यात वाहून गेले. दौलत पावर यांना शोधण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
रोह्यात जोरदार पावसामुळे कुंडलिका नदी भरून वाहत असून रोहा अष्टमी जुना पूल बुधवारी वाहातुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नेरळमध्ये उल्हास नदीत एक जण वाहून गेला
कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळ नजीकच्या ममदापूर रेल्वेफाटकाजवळील नाल्यावर मासेमारी करण्यासाठी गेलेला एक जण गुरुवारी (दि. 7) सायंकाळी उल्हास नदीत वाहून गेला. तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्व नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. नेरळ परिसरातील दामत रेल्वे फटकाच्या अलीकडे वाहणार्‍या नाल्यात एक जण मासेमारी करीत असताना नाल्यातून उल्हास नदीमध्ये वाहून गेला. ममदापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी तेथेच असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी आले होते. त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी लागलीच त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु नाल्यातील पाण्याचा वेग इतका होता की, काही वेळातच तो इसम उल्हास नदीच्या पात्रात वाहून गेला. हा इसम कोण आहे? याबद्दल काहीच समजले नसून नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply