Breaking News

एक हात पूरग्रस्तांसाठी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकापासून सेलिब्रिटीपर्यंत आणि राजकीय पक्ष ते सामाजिक संस्था-संघटना अशा सर्व स्तरांतून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांसाठी शक्य ते सहकार्य राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक करीत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा सर्व जण निस्पृह भावनेने एकवटतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हाहाकार माजविला. त्याचा फटका अवघ्या महाराष्ट्राला बसला. विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने अपरिमित नुकसान झाले आहे. यापूर्वीही सन 1989 आणि 2005मध्ये पूर आले होते, पण त्याहीपेक्षा भयंकर असा महापूर या वर्षी आला आणि होत्याचे नव्हते करून गेला. एखाद-दुसरा दिवस पूर येऊन जातो तरी उरात धडकी भरते. तिथे तर तो अनेक दिवस मुक्कामाला होता. यावरून या जलप्रलयाची कल्पनाच केलेली बरी.

महापुराचा जबरदस्त तडाखा नागरी वस्त्यांना बसला. शेकडो गाव-शहरांत पाणी शिरले. हजारो घरे पाण्याखाली गेली. लाखो जण पूरग्रस्त झाले. असंख्य नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी पडले. मुक्या जनावरांचाही बळी गेला. निसर्ग कोपल्याने अस्मानी संकटाला सार्‍यांना सामोरे जावे लागले. परिणामी कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, प्रचंड वाताहत झाल्याचे विदारक चित्र दिसून येते. शेती पाण्याखाली गेल्याने पीकही वाया गेले आहे. साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले,’ अशी बिकट स्थिती पूरबाधितांची झाली आहे.

रायगड जिल्ह्यातसुद्धा यंदा अतिवृष्टी झाली. दोन महिने आधीच वरुणराजाने वार्षिक सरासरी गाठली. यावरून किती पाऊस पडला असेल याचा अंदाज येऊ शकतो. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. महाड, पेण, रोहा, नागोठणे येथे हानीचे प्रमाण अधिक आहे. आता आव्हान आहे ते या परिस्थितीतून नुकसानग्रस्तांना सावरण्याचे. यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांसाठी सहा हजार कोटींची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. ती येईपर्यंत राज्याच्या तिजोरीतून आवश्यक निधी मुख्यमंत्री नुकसानभरपाईच्या स्वरूपात अदा करीत आहेत. तातडीची मदतही रोख देण्यात येत आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शासनामार्फत केला जात आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातून असंख्य हात पुढे आले आहेत. विविध राजकीय पक्ष, नेतेमंडळी, सामाजिक संस्था-संघटना, गणेशोत्सव मंडळे, सिने तारे-तारका, क्रिकेटपटू असे सारे घटक सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पूरबाधित नागरिकांसाठी धावून आले आहेत. कुणी रोख रक्कम दिली, कुणी आपले महिनाभराचे वेतन देऊ केले, तर कुणी खाण्या-पिण्याची साम्रुगी पाठविली. काही जण थेट पूरग्रस्त भागात जाऊन अन्नधान्य, कपडालत्त्याचे सढळ हस्ते वाटप करीत आहेत. कुणी मोफत सेवा देत आहेत.

एरवी छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद निर्माण करणारी मंडळी आपत्तीग्रस्तांसाठी जात, धर्म, भाषा, प्रांत असा भेदभाव विसरून एकत्र आले आहेत. हेच आपल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. या नैैसर्गिक आपदेत ज्यांनी सर्वस्व गमावले अशांना मदतीबरोबरच धीर, आधार देण्याची गरज आहे.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा 

ही पूरग्रस्तांची अपेक्षा आहे. पुरामुळे विस्कळीत झालेली त्यांच्या जीवनाची घडी बसण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्या दृष्टीने सहकार्य म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला

तरी खूप होईल.

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply