अनुच्छेद 370 रद्द करण्याचे दोन सुपरिणाम आपण गेल्या लेखात पाहिले. एक म्हणजे काश्मीरचे संदर्भात उर्वरित भारतातील प्रामुख्याने हिंदूंवर घालण्यात आलेली आणि निष्ठूरपणे राबविण्यात आलेली अस्पृश्यता अस्तंगत झाली. दुसरे म्हणजे राष्ट्राची सार्वभौमता स्थिरावली आणि सुदृढ दिसू लागली. आणखी दोन आणि तेवढेच महत्त्वाचे बदल झाले. एक म्हणजे मुसलमानांची दुहेरी निष्ठा डळमळीत झाली आणि त्यांच्यात विज्ञाननिष्ठा रुजविण्यात येणारे अडथळे दूर होऊ शकतात अशी आशा निर्माण झाली. यानिमित्ताने पाकिस्तान आणि भारत ह्यांच्या पंतप्रधानांची त्यांच्या स्वातंत्र्यदिनी केलेली भाषणे तपासणे उद्बोधक ठरेल. पाकिस्तानचे पंतप्रधान क्रिकेटपटू इम्रान खान ह्यांचे भाषण म्हणजे संगीत मानापमान नाटकातील लक्ष्मीधराचे उसने अवसान वाटते. आम्ही काश्मिरी जनतेच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभे राहणार आहोत आणि जगातील उपलब्ध प्रत्येक व्यासपीठावरून काश्मीरसाठी लढणार आहोत, अशी गर्जना त्यांनी केली आहे, परंतु त्यांच्या हे लक्षात आले आहे की पाकिस्तान आता पूर्णपणे एकटा पडत चालला आहे. इम्रान खान क्रिकेट खेळत होते तेव्हा ते म्हणत की, आम्ही इतरांशी क्रिकेट खेळतो तेव्हा तो खेळ असतो आणि भारताशी खेळतो तेव्हा ते युद्ध असते. आज इम्रान खान राजकारणात आहेत आणि भारताशी युद्ध करणे म्हणजे पोरखेळ नव्हे हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. भारताला सैनिकी आव्हान तर आपण कधीच देऊ शकलो नाही, पण पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष आणि सरसेनापती इंझमाम-उल-हक ह्यांच्या रणनीतीनुसार लहानमोठे अचानक असंख्य घाव घालून भारताला सतत जखमी अवस्थेत ठेवायचे आणि जीव नकोसा करून सोडायचे हेही आता शक्य दिसत नाही. पाकिस्तान भारताचे काही वाकडे करू शकत नाही ही भावना भारतात बळावत असल्याची भीती इम्रान खान ह्यांना वाटत आहे आणि येथेच नरेंद्र मोदी ह्यांच्या रणनीतीने फार मोठा मनोवैज्ञानिक विजय प्राप्त केला आहे.
भारतावर इस्लाम धर्मीयांनी आक्रमण सुरू केले तेव्हापासून म्हणजे इस 711पासून अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करणे हेच ध्येय राहिले आहे. ते शक्य होत नाही असे दिसताच सध्याच्या पाकिस्तानवर समाधान मानायचे ठरले आणि तेथून वेगवेगळ्या आघाड्या उघडून संपूर्ण भारताचे महापाकिस्तानात रूपांतर करण्यासाठी कारवाया करण्याचे योजिले गेले. त्यादृष्टीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादाचे मोठे तळ उघडण्यात आले. भारताविरुद्ध छुपे युद्ध सुरू झाले, पण त्याही आघाडीवर पुढे जाऊन टोक गाठता येईल अशी शक्यता पाकिस्तानला वाटेनाशी झाली आहे. पुढच्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला आपल्याकडे असलेला काश्मीरचा भूभाग भारताकडे गेलेला
असेल काय ह्या भीतीने पाकिस्तानला ग्रासले आहे. भारतातील अंतर्गत घडामोडींचा परिणाम जसा पाकिस्तानच्या चढउतारावर होत असतो तसा पाकिस्तानातील राजकीय यशापयशाचा परिणाम भारतातील अल्पसंख्याक समाजावर होत असतो. भारतातील मुसलमानांचे तारणहार आम्हीच आहोत, अशी हवा पाकिस्तानने निर्माण करून ठेवली आहे. तेच त्यांचे अस्तित्वाचे मुख्य भांडवल राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात मुस्लिम लीग आणि मोहमद अली जिना काँग्रेसला मुसलमानांचे प्रतिनिधित्व करू देण्यास सतत विरोध करत राहिले. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या अल्पसंख्याक समाजाला मिळेल तेथून पाठिंबा हवा असतो. भारतातील मुसलमानांची ती मानसिक गरज आजपर्यंत पाकिस्तान पुरवत होता. त्याही आघाडीवर पाकिस्तान आता उघडा पडू लागला आहे. पाकिस्तानला स्वतःचे घर सांभाळताना नाकीनऊ येऊ लागले आहेत, तर तो आपली काळजी काय घेणार ह्या विदारक सत्याची जाणीव भारतातील मुसलमानांना होऊ लागली आहे. ही भावनिक स्थित्यंतराची सुरुवात आहे. येथून पुढे कसल्याही प्रकारच्या मानसिक आधारासाठी आपल्याला पाकिस्तानकडे पाहता येणार नाही ही उमज भारतातील मुसलमानांना पडू लागली आहे.
हिंदुत्वनिष्ठ पक्ष मुस्लिमद्वेष्टे असतात आणि त्यांचे सरकार सत्तेवर आले तर मुसलमानांच्या कत्तली होतील, असा खोटा प्रचार गेली 70 वर्षे भारतात चालू आहे, पण त्यात तसूभरही सत्य नाही हे मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या राजवटीने सगळ्यांच्या लक्षात आणून दिले आहे. हिंदू हा जन्मत: आध्यात्मिक असल्याने तो धर्मनिरपेक्ष आणि अहिंसक असतो हे विक्रमादित्यापासून शिवाजी महाराजांपर्यंत सर्व हिंदू राजवटीतून लख्खपणे दिसून आले आहे. ‘सब का साथ, सब का विकास,’ ही नरेंद्र मोदी सरकारची घोषणा आहे. खरे म्हणजे ती फार जुनी आहे. तिला शतकांची परंपरा आहे. बिभीषण हा रावणाचा भाऊ असू शकतो हा हिंदू विचार आहे. त्यामुळे हिंदू मानसिकता कोणाचा द्वेष करीत नाही. ह्याचे प्रत्यंतर मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांनी दिले आहे. गरिबांसाठी ज्या मूलगामी योजना मोदी सरकारने राबविल्या त्याचा लाभ जेवढा हिंदूंना झाला तेवढाच मुसलमानांना आणि इतर अल्पसंख्याकांना झाला. ह्याचा परिणाम मुसलमानांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे. नागरिक म्हणून भारताप्रति निष्ठा बाळगणे त्यांचे कर्तव्यच होते, पण मानसिक आधार म्हणून पाकिस्तानकडे पाहावे असेही त्यांना वाटत होते. गेली 100 वर्षे मुसलमानांची मानसिकता त्यादृष्टीने प्रशिक्षित करण्यात आली आहे. त्याला जेवढे धर्मांध मुस्लिम धर्मगुरू उत्तरदायी आहेत तेवढेच हिंदू समाजातले भ्रांत राष्ट्रवादीही आहेत. 100 वर्षांतील नेतृत्वाची ही लढाई नरेंद्र मोदी ह्यांनी अवघ्या पाच वर्षांत भारताच्या बाजूने वळविली आहे. आता कसल्याही आधारासाठी मुसलमानांना पाकिस्तानकडे बघण्याची आवश्यकता नाही. धार्मिक अल्पसंख्याक म्हणून आणि भारताचे नागरिक म्हणून त्यांना जो ऐहिक आणि पारलौकिक विकास साधायचा असेल तर त्यादृष्टीने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. मुसलमानांची अनावश्यक असलेली दुहेरी निष्ठा एकेरी झाली हे केवढे तरी मोठे मानसिक परिवर्तन अनुच्छेद 370 रद्द केल्याने झाले आहे. अशी स्थित्यंतरे एका रात्रीत होत नसतात. त्याला साकार व्हायला 40-50 वर्षे लागू शकतात. ही सुरुवात आहे आणि सर्वांचे सहकार्य मिळाले, तर ती क्रांतिकारक ठरणार आहे.
यानिमित्ताने भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या भौतिक प्रगतीची तुलना करणारे लेख अनेक नियतकालिकांतून येऊ लागले आहेत. भारताला विज्ञानवादी नेहरूंचे नेतृत्व लाभल्यामुळे चांद्रयान मोहिमेपर्यंत भौतिक प्रगती तो करू शकला. दुर्दैवाने पाकिस्तानला धर्माभोवती फेर धरणारे मुल्लामौलवींचे नेतृत्व लाभले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील आणि पाकिस्तानातील मुसलमान एकत्रच राहत होते. त्यांची मानसिकता विज्ञाननिष्ठ व्हावी म्हणून कोणी परिश्रम घेतले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांनी. आधुनिक भारतात मुसलमानांनी विज्ञाननिष्ठ व्हावे म्हणून ज्या दोन व्यक्तींनी विशेष कष्ट घेतले त्यापैकी एक म्हणजे सावरकर आणि दुसरे म्हणजे डॉ. आंबेडकर. हिंदूंवर उपकार करण्यासाठी नव्हे तर तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी विज्ञाननिष्ठ व्हा, असा उपदेश सावरकरांनी केला आहे. युरोपात ख्रिस्ती लोकांनी बायबल मिटून ठेवले आणि ते विज्ञाननिष्ठ झाले. त्याबरोबर ते सगळ्यांच्या पुढे भौतिकशास्त्रात मानांकित झाले आणि मुसलमानांना तेथून पलायन करावे लागले. तुमची अधिक अधोगती होऊ नये म्हणून विज्ञाननिष्ठ व्हा, असे कळवळून सावरकरांनी सांगितले आहे. हिंदुस्थानातला मुसलमान जसा शरीराने धष्टपुष्ट असायला हवा आहे तसा तो मनाने विज्ञाननिष्ठ हवा आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने सावरकरांचे विज्ञानविषयक सर्व साहित्य जिज्ञासूंनी वाचण्यासारखे आहे. तात्पर्य हे की अनुच्छेद 370 निरस्त झाल्यामुळे मुसलमानांतील दुहेरी निष्ठा उताराला लागली आणि विज्ञाननिष्ठा चढावावर खेचता येईल अशी संधी प्राप्त झाली. हेही नसे थोडके.
-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)