Breaking News

शेतीचा खर्च कमी करणारा तरुण शेतकरी

रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या वदप गावातील शेतकरी लक्ष्मण दळवी यांंनी शेतीमध्ये मोठे नाव कमावले होते. भाताचे एकरी सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी अशी त्यांची ओळख होती. आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित शेती कसण्यासाठी कामगार आणि मजूर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली अडचण ही आपल्या मुलांना सांगितली. मग निलिकेश या मुलाने लावणीसाठी भात लावणीसाठी एक यंत्र तयार करण्याचे ठरविले आणि त्यात निलिकेशने केलेले काम हे मोठ्या प्रमाणात भाताची शेती करणार्‍या शेतकरीवर्गाला मदत करणारे ठरले आहे. निलिकेश लक्ष्मण दळवी यांनी आपल्या बंधूला सोबत घेऊन केलेली निली रिपर आणि निली ड्रमसीडर ही दोन यंत्रे पाहिली की त्यांच्या कामाची प्रचिती येते.  

कोकणामध्ये पारंपरिक भात पेरणी, लावणीचे आधी शेताची भाजणी (राब) भाजली जाते. त्यामुळे भात लागवडीचा खर्च वाढतो व एकरी भात लावणीसाठी (पुनर्लावणी)  मजूर लागतात. त्यावर पर्याय म्हणून ड्रमसीडरची निर्मिती केली. राब भाजणीमुळे सेंद्रीय घटकांचा र्‍हास होतो, तसेच त्याला खूप मजूरही लागतात. कोकणामध्ये जवळपास 4.14 लाख हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. हे ड्रमसीडर वापरले तर 1/3 क्षेत्र जर ड्रमसीडर लागवडीखाली आहे, तर दोन अब्ज 83 कोटी 50 लाख रुपयांची बचत होऊ शकते हे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतच्या कृषिविस्तार शास्त्रज्ञांचे मत आहे. साधारणत: एका एकरास उत्पादन खर्चामध्ये 6000 रुपयांची बचत होते. आम्ही बनवलेली अवजारे ही जास्तीत जास्त मजुरांची बचत करणारी आहे.

निली ड्रमसीडरला सायकलची चाके असल्याने ओढण्यास अत्यंत हलके आहे. पेरणीसाठी एकरी 12 ते 15 किलो भातबियाणे लागते. एका दिवसाला साधारणतः दोन माणसे दोन एकरची पेरणी करतात. आतापर्यंत बनलले सर्व ड्रमसीडर हे चिखलावर पेरणी करणारे आहेत, पण आम्ही बनवलेले ड्रमसीडर हे वापसा व घुळवाफा तसेच चिखलावरसुद्धा उपयुक्त आहेत. वापसा व घूळवाफा पेरणी करताना शेतामध्ये बियाणे उघडे राहत नाही. त्यामुळे पक्ष्यांकडून नासाडी होण्याचा धोका नसतो. भाताव्यतिरिक्त इतरही धान्ये पेरता येतात. भातशोतीमध्ये पुनर्लागवड करण्याची आवश्यकता लागत नाही. या पद्धतीमध्ये पीक 8 ते 10 दिवस लवकर तयार होते. या पद्धतीत सलग ओळीत दाणे पडत असल्याने रोपांची संख्या वाढते. त्यामुळे उत्पादनात आपोआपच वाढ होते. तण नियंत्रणासाठी कोळपे वापरता येते. त्यामुळे तण नियंत्रण कमी खर्चिक होते. ओळीत पेरणी केल्याने मशागतीची कामे जलद व चांगल्या प्रकारे करता येतात. या पद्धतीमुळे लावणीइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त उत्पादन मिळते. पीक लवकर तयार झाल्यामुळे कीड व रोगापासून पिकाचा बचाव होतो. एकावेळी चार ओळींची पेरणी करता येते. दोन ओळींमधील अंतर नऊ इंच आहे. हे अवजार माणसाने ओढण्याचे असल्याने

इकोफ्रेंडली आहे. स्वत: दळवी शेतकरी आहेत. आपल्या शेतामध्ये भात कापणी करताना त्यांच्या लक्षात आले की सध्या प्रचलित असणारी कापणी यंत्रे भाताची कापणी जमिनीपासून पाच ते सहा इंचावर करतात. त्यामुळे पेंढा फुकट जातो. त्याशिवाय पेंढ्याच्या खोडामध्ये जो खोडकीडा असतो तो तीन इंचाच्या खाली असतो. पाच ते सहा इंचावर कापणी केल्याने तो कीडा जमिनीमध्ये तसाच राहतो, तसेच काही यंत्रे ही चिनी बनावटीची असल्यामुळे त्यांची गुणवत्ता चांगली नाही व ती परदेशातून आयात केल्यामुळे देशाचे परकीय चलनाचे नुकसान होते. प्रचलित यंत्रातील त्रुटीमुळे शेतकर्‍यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. दळवी यांनी या प्रश्नांवर रामबाण उपाय शोधला आहे. त्यांनी असे एक यंत्र तयार केले ज्यामुळे भात कापणी एक ते दोन इंचावर होते. त्यामुळे खोड किड्याचा नायनाट होतोच. त्याचबरोबर पेंढासुद्धा जास्त मिळतो. त्याचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो. त्याशिवाय एका ओळीत कापणी होत असल्याने पेंढा उचलण्यास सोपे जाते. हे कापणी यंत्र पॉवर टीलरला जोडावयाचे असल्याने शेतकर्‍यास इंजीन व गिअर बॉक्स वेगळा घेण्याची आवश्यकता भासत नाही. या यंत्रामुळे एक माणूस साधारण दोन तासांमध्ये एक एकरची कापणी आरामात करू शकतो. साधारण एका दिवसाला तीन ते चार एकराची कापणी होऊ शकते. सद्यस्थितीत एकरी 60 ते 70 मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतकर्‍याचा बराचसा  उत्पादन घेताना खर्च होतो. त्यामुळे भातशेती परवडणारी नव्हती. अशा वेळी उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कै. लक्ष्मण बाबूराव दळवी यांनी सुरुवातीच्या काळात पॉवर ट्रीलरची दुरुस्ती देखभालीने सुरुवात करताना त्यांच्या असे लक्षात आले की पॉवर ट्रीलर हे बहुउपयोगी अवजार आहे. त्याला आपण वेगवेगळ्या जोडण्या जोडू शकतो. त्यामध्ये प्रथमतः मळणीयंत्र, भात साफ करावयाचा पंखा, पाण्याचा पंप, औषध फवारणी पंप तसेच जनरेटर अशी विविध प्रकारची अवजारे जोडली. वाढत्या शहरीकरणामुळे स्थानिक पातळीवर जसजशी मजुरांची टंचाई होत गेली, तसे भातलावणी व कापणी, बांधणी, मळणीसाठी प्रचंड खर्च होत होता. तो खर्च कमी करण्यासाठी ड्रम सीडर व पॉवर ट्रीलरला जोडावयाची अटॅचमेंट तयार केली. थ्रशर, हार्वेस्टर जपानहून जुनी मशिनरी आयात करून शेतकर्‍यांना रास्त भावात उपलब्ध करून देतो. या अवजारांमुळे शेतकर्‍याच्या उत्पादन खर्चात 90 टक्के बचत होते. त्यामुळे अल्प किमतीचे हे ड्रमसीडर यंत्र सर्व शेतकर्‍यांना भात लागवड करण्यासाठी मदतगार ठरत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply