रोहे ः प्रतिनिधी
कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या वतीने रोहे शहरातील राम मारूती चौक ते नगर परिषद कार्यालय अशी कुंडलिका नदी बचाव मोहीम रॅली काढण्यात आली होती. या रॅलीने नगर परिषदचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना लेखी निवेदन दिले. या वेळी कुंडलिका नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले.
रोह्याची जीवनवाहिनी म्हणून कुंडलिका नदीकडे पाहिले जाते. अष्टमी नगर परिषदेच्या वतीने या नदीच्या दोन्ही बाजूंना कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरूंद होणार असून, भविष्यात रोहा शहराला पुराचा धोका निर्माण होईल. कुंडलिका नदीचे पात्र अरूंद करू नये, अशी कुंडलिका बचाव संघर्ष समितीची मागणी आहे.
कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्यावतीने राम मारूती चौकातून काढलेली रॅली तीन बत्ती नाका, एसटीस्टँड मार्गे नगर परिषद कार्यालयापर्यंत आली. या रॅलीत नगरसेविका समिक्षा बामणे, आप्पा देशमुख, अॅड. मनोजकुमार शिंदे, समिर शेडगे, संदिप तटकरे, दिलीप वडके, सुरेश मगर, दिपक तेंडुलकर, संतोष खटावकर, उस्मान रोहेकर, अॅड. हर्षद साळवी, विजय देसाई, निता हजारे, महादेव साळवी, संतोष खेरटकर, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, दिलेश पिंपळे, स्वरांजली शिर्के, योगेश डाखवे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. यावेळी रॅलीच्या वतीने मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. कुंडलिका नदी आपली जीवनवाहिनी आहे. रोहे अष्टमी शहराला धोका पोहचेल असे कोणतेही काम या नदीच्या पात्रात करू नये, भराव करून नदीचे पात्र अरूंद करू नये, असे सुरेश मगर यांनी यावेळी सांगितले. तर समिर शेडगे यांनी, आमचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र नदीचे पात्र अरुंद करण्याचे काम आता चालु आहे, याला आमचा विरोध असल्याचे सांगितले.