अलिबाग : प्रतिनिधी
पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरु करावी, या इतर मागण्यांसाठी भाजपच्या वतीने एसटीच्या रायगड विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.
भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश मोहिते, शहर अध्यक्ष सुनील दामले, परशुराम म्हात्रे, अशोक वारगे यावेळी उपस्थित होते. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी हे निवेदन स्विकारले. एसटी प्रवाशांच्या विविध प्रश्नाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
दिवा -पेण दरम्यान रेल्वेकडून शटल सेवा चालवली जाते. या शटल सेवेच्या वेळेनुसार पेण स्थानकातून अलिबाग येथे बस सेवा सुरु करण्यात यावी. पनवेल रेल्वे स्थानकातून संध्याकाळी अलिबाग मार्गावर एसटीची बससेवा सुरु करण्यात यावी. पनवेल बस स्थानकातून अलिबागसाठी रात्री साडे नऊ आणि दहा वाजता विनावाहक बस सुरु करण्यात यावी. अलिबाग ते पेण दरम्यान संध्याकाळी साडेसहा आणि सात वाजता बस सोडण्यात यावी, अलिबाग- पुणे दरम्यान द्रुतगती महामार्गावरून सकाळी, संध्याकाळ बससेवा सुरु करण्यात यावी. प्रवासी संख्या जास्त असल्यास अलिबाग – पनवेल मार्गावर जादा बसेस सोडण्याचे निर्देश दोन्ही स्थानक प्रमुखांना देण्यात यावे, अलिबाग – सातारा आणि अलिबाग – नाशिक दरम्यान एसटीची बससेवा सुरु करण्यात यावी. या मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.