पनवेल ः बातमीदार
प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि त्यांची पत्नी यांना स्वतंत्रपणे सहभागी झाल्यावर व वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल. हा हप्ता वयाच्या 60 वर्षांपर्यंत भरावयाचा आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबद्दल माहिती देतात तहसीलदार अमित सानप यांनी सांगितले की, या योजनेची जनजागृती करण्यात येत असून ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा या योजनेसाठी नाव नोंदविता येणार आहे. या संदर्भात काही अडचणी आल्यास गावचे सरपंच, तलाठी, कृषी सहायक, आदींचे सहकार्य घेण्यात यावे. या योजनेच्या नोंदणीमधून कुठलाही पात्र लाभार्थी सुटता कामा नये असेही निर्देश तहसीलदार अमित सानप यांनी दिले आहेत.
या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकर्यांनी आधारकार्ड, गाव नमुना 8 अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणावी. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकर्यांची पडताळणी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे.