कर्जत ः बातमीदार
कर्जत पंचायत समिती कार्यालयात असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे पुतळे अंधारात, जमिनीवर पाणी असलेल्या जागी आणि आजूबाजूच्या भिंती काळपट अशा स्थितीत होते. दरम्यान, तालुक्यातून याबाबत सर्वांनी आवाज उठविल्याने कर्जत पंचायत समिती खडबडून जागी झाली आणि त्यांनी परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्याचे काम केले. आता सदर हॉलचे सुशोभीकरण व्हावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार केले आहे.कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी हौतात्म्य प्राप्त झाले. दोन्ही हुतात्म्यांचे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे 1978मध्ये तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांनी पुढाकार घेऊन बसविले होते. ते पुतळे नवीन पंचायत समिती कार्यालयात मागील वर्षी तत्कालीन सभापती अमर मिसाळ यांनी पुढाकार घेऊन स्थापित करून घेतले होते, मात्र ऑगस्ट 2020मध्ये झालेल्या वादळात कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या दुसर्या मजल्यावर लावलेले दोन पत्रे उडून गेले. त्यामुळे मागील दीड महिना त्या मोकळ्या जागेतून येणारे पाणी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांचे पुतळे बसविलेल्या ठिकाणी कोसळत होते. त्यातच हॉलमध्ये विजेचा दिवाही नसल्याने जमिनीवर साचलेले पाणी पाहून कोणी आत प्रवेश करीत नव्हते. त्यात पावसाचे पाणी खाली पडत असल्याने तेथे लावलेले सिलिंग गळू लागले आणि काही भाग कोसळलादेखील होता. त्यामुळे संपूर्ण हॉल काळपट रंगाने भरून गेला होता. संबंधित दुरवस्थेची माहिती संपूर्ण कर्जत तालुक्यात पसरली आणि सर्व स्तरातून कर्जत पंचायत समितीवर टीकेची झोड उठली. या दुरवस्थेबाबतचे सविस्तर वृत्त दै. ‘राम प्रहर’च्या गुरुवारच्या (दि. 10) अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर कर्जत पंचायत समितीला जाग येऊन त्यांनी परिसर स्वच्छ करून रंगरंगोटीचे काम करण्यात आले. सर्व स्तरातून कर्जत पंचायत समितीचे अधिकारी व विद्यमान पदाधिकार्यांवर टीका होताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रभारी गटविकास अधिकारी सी. एस. राजपूत यांनी तत्काळ पूर्वी लावण्यात आलेले छप्पर बाजूला करून तेथे पावसाचे पाणी पडणार नाही याची व्यवस्था केली. त्याच वेळी रंग काळपट झाल्याने परिसर अंधारमय वाटत होता. त्यामुळे पुतळे ठेवण्यात आलेली जागा संपूर्ण पांढर्या रंगाने रंगवून घेतली, तर राजकीय आणि सरकारी पातळीवर दबाव आल्याने तत्काळ बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रल्हाद गोपणे यांना बोलावून छत्रपती शिवराय आणि हुतात्म्यांचे पुतळे असलेला हॉल सुशोभीत करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले आहे. ही सर्व कामे एका दिवसात कर्जत पंचायत समितीच्या अधिकारीवर्गाने करून घेतली. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण डामसे हे कामासाठी पंचायत समिती कार्यालयात येताच त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रभारी गटविकास अधिकारी राजपूतही उपस्थित होते.
आम्ही या सभागृहात काम केले आहे. एकही बैठक छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण केल्याशिवाय सुरू केली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तो व्हिडीओ बघून वाईट वाटले होते, पण आता काहीतरी बदल झाला आहे हे पाहून बरे वाटले.
-तानाजी चव्हाण, माजी सभापती
या प्रकाराने माझ्यासह संपूर्ण तालुका पेटून उठला होता. त्यामुळे कर्जत पंचायत समितीने दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकांची नाराजी काही प्रमाणात का होईना दूर झाली आहे.
-भरत भगत, अध्यक्ष, क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठान