Breaking News

रस्त्याचा भराव गेला वाहून ; कर्जत-कल्याण मार्गावर अपघातांची भीती

कर्जत : बातमीदार

कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्यावर ठाणे जिल्हा हद्दीपासून 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या मार्गावरील शेलू गावानजीक असलेल्या रस्त्याचा मातीचा भराव वाहून गेला आहे. तो रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना समजून येत नसल्याने या ठिकाणी अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. प्रचंड पावसामुळे शेलू गावाच्या हद्दीतील रेल्वेमार्गाचा मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तब्बल दोन दिवस मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच परिसरातून कल्याण रस्ता नेरळ येथे येत असून, या रस्त्याचाही मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्याबाबत शेलू येथील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी अंधारात त्या भागात वाहन चालकांना रस्त्याचा वाहून गेलेला भागाची माहिती होत नाही. त्या ठिकाणी असलेले वळण लक्षात घेता नेरळकडील वाहने थेट रस्त्याखाली जाऊन शेतात कोसळू शकतात, अशी स्थिती निर्माण झाली असून, त्या बाबत गेल्या 20 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम केले नाही.

पोलीस पाटील असलेले मनोज पाटील यांनी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मातीने भरून त्यावर पांढरा रंग लावून त्या पिशव्या या धोकादायक भागात ठेवल्या होत्या. मात्र सततच्या पावसामुळे त्या पिशव्या कोसळून गेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीचा फलक आणि अंधारात चमाकणारी रेडियमपट्टी लावण्याची गरज आहे. येथे तत्काळ मातीचा भराव टाकण्याची गरज आहे.

कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्याचा शेलू परिसरातील भाग धोकादायक झाला असल्याची माहिती आहे. त्याची माहिती या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला देण्यात आली असून तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

-अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-कर्जत

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply