उरण : जीवन केणी
ख्रिसमसच्या सुटीमुळे घारापुरी बेटावर पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून, वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे पर्यटकांना एमटीडीसीमधील
उपाहारगृहामध्ये जादा रक्कम आकारूनही योग्य पद्धतीचे अन्न मिळत नसल्याने येणार्या पर्यटकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचप्रमाणे घारापुरी बेटावरील टपरीधारक पाण्याच्या बाटल्यांचे अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याने पर्यटकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
देशाची आर्थिक राजधानी संबोधल्या जाणार्या मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील लेण्या पाहण्यासाठी, तसेच बेटावरील नैसर्गिकतेचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटक त्यांच्या कुटुंबियांसह येतात. या वर्षी ख्रिसमसची सुटी असल्याने बेटावर हजेरी लावणार्या पर्यटकांना योग्यतेने जेवण उपलब्ध करून देणार्या एमटीडीसीच्या उपाहारगृहात जादा पैशांची आकारणी करूनही योग्य पद्धतीचे जेवण व इतर खाद्यपदार्थ मिळू न शकल्याने पर्यटकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे, तर घारापुरी बेटावरील काही टपरीधारक एक लिटर पाणी बाटलीचे 20 रुपये आकारणी करण्याऐवजी प्रति बाटलीचे 30 ते 40 रुपये आकारत आहेत. शिवाय विदेशी पर्यटकांकडून एक लिटर पाण्याच्या बाटलीचे 100 ते 200 रुपये अशी भरमसाठ आकारणी घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण, पाण्याची बाटली, तसेच इतर पदार्थ यांचे दर शासनाच्या नियमानुसारच आकारण्यासाठी व पर्यटकांसाठी 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
एमटीडीसी उपाहारगृहाचे व्यवस्थापक म्हणतात,
घारापुरी बेटावरील एमटीडीसीच्या उपाहारगृहाचे व्यवस्थापक महेश ठाकूर यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, पर्यटक अचानकपणे अधिक संख्येने येत असल्याने येथील कामगारांची तारांबळ उडत असल्याने पर्यायाने जेवणाच्या थाळीत तफावत होत आहे, मात्र जेवणाची थाळी व इतर पदार्थांच्या किमतीत तफावत का केली जात नाही? यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.