Breaking News

महाड आगाराचा गलथान कारभार ; शिवशाही अचानक रद्द, प्रवाशांचे हाल

महाड : प्रतिनिधी            

येथील एसटी आगारातून सोमवारी (दि. 26) सकाळी बोरीवली येथे जाणारी शिवशाही बस अचानक रद्द करुन त्याऐवजी साधी बस सोडण्यात आली. त्यामुळे शिवशाहीचे आरक्षण केलेले प्रवाशी संतप्त झाले. काही संतप्त प्रवाशांनी तर माणगाव स्थानकात आल्यानंतर बस अडवून धरली. सकाळची शिवशाही बस रद्द करण्याचे प्रकार वारंवार होत असून महाड आगारप्रमुख ते जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप हे प्रवासी करीत होते. अखेर पोलीस आणि पत्रकारांनी मध्यस्थी करुन ही बस मार्गस्थ केली.

कार्यालयीन आणि व्यवसायिक कामासाठी मुंबई आणि उपनगरात जाणार्‍या प्रवाशांची सोमवारी महाड बस स्थानकावर गर्दी झाली होती. ते सर्व सकाळी 6.45च्या महाड -बोरीवली या शिवशाही बसची वाट पहात होते. ही बस सकाळी 7.15 वाजता लावली खरी, मात्र ती शिवशाही ऐवजी साधी आराम बस होती. हे तर रोजच चालू आहे, असा संताप व्यक्त करत ‘चला काम महत्वाच आहे, एसटीवाल्यांच्या तोंडाला कोण लागेल‘ असे म्हणत प्रवाशांनी बसमध्ये चढण्याचा निर्णय घेतला.

काही प्रवाशांनी महिला वाहकांना जाब विचारला मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत  प्रवाशांजवळ असभ्य वर्तन केले. ही बस माणगाव स्थानकात आली असता, त्या ठिकाणी ऑनलाइन आरक्षण केलेल्या तीन प्रवाशांनी एसटीच्या कारभाराविरोधात राग व्यक्त करत ही बस तब्बल दीडतास अडवून धरली. अखेर माणगाव पोलीस आणि काही पत्रकारांनी  या प्रवाशांची समजूत काढून बस मार्गस्थ केली. एकीकडे शिवशाहीचा प्रवासी वर्ग वाढत आहे, तर दुसरीकडे महाड आगार शिवशाही बस उपलब्ध असतानाही त्यांच्या फेर्‍या रद्द करत आहे. यामुळे  महाड स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांध्ये नाराजी आहे. मुंबई आणि बोरीवली मार्गावरील शिवशाहीचे ऑनलाइन आरक्षण पूर्ण झाले नाही, तर महाड आगार व्यवस्थापक ही शिवशाही परस्पर रद्द करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply