Breaking News

‘नगरविकास विभागाच्या विरोधातील प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि धिंडविरोधात रस्त्यावर उतरणार’

रोहे ः प्रतिनिधी

रोहे शहराच्या विकासकामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे. रोह्यात नदीसंवर्धानसह अन्य चांगली कामे चालू आहेत, परंतु काही लोक या कामाला विरोध दर्शवीत आहेत. रोह्यातील सीटीजन फोरमच्या काही सदस्यांनी कामाला विरोध व मुख्याधिकार्‍यांच्या बदलीविषयी नगरविकास खात्याविरोधात बैठक घेऊन ते प्रतिकात्मक अंत्ययात्रा व धिंड काढणार आहेत. नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्याकडे आहे. त्यामुळे अत्यंयात्रा व धिंड काढणे निंदनीय आहे. आमची राजकीय विचारधारा वेगळी असू शकते, परंतु रोह्यात काढण्यात येणार्‍या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला आमचा विरोध असून आम्ही रस्त्यावर उतरून याचा ठाम विरोध दर्शविणार असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

सुनील तटकरे म्हणाले की, कुंडलिका संवर्धन, पिण्याचे पाणी योजना, भुयारी गटारे यासह अन्य कामे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेमुळे होत आहेत. यासंदर्भात पर्यावरण, नगरविकास खात्याची परवानगी पाहाणी झाली त्या वेळी नागरिकही उपस्थित होते.राज्यस्तरीय सुवर्ण जयंती नगरोथ्यन माध्यमातून या प्रकल्पांना मान्यता मिळाली. आज या प्रकल्पांचे 65 ते 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सन 1989, 2005पेक्षा यंदा जास्त पाऊस पडला. नदीच्या पुलावर पाणी आले की बाजारपेठेत पाणी येते, परंतु या वर्षी नदीसंवर्धन प्रकल्पामुळे रोह्यात तुलनेत पाणी कमी आले. बाजरपेठेत पाणी दिसून आले नाही. या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने मान्यता मिळाली, मात्र रोह्यातील सीटीझन फोरमची मंडळी नगरविकास विभागाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व धिंड काढणार असतील, तर याचा आम्ही निषेध करीत आहोत.

मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच मुख्याधिकार्‍यांच्या बदल्या होत असतात. महत्त्वाचे म्हणजे आधी मुख्याधिकारी चांगले होते आणि आता त्यांच्यावर आरोप हे कळण्यापलिकडे आहे. विरोधाला वैचारिक झालर आवश्यक आहे, परंतु एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणे निंदनीय आहे, असे खासदार तटकरे म्हणाले.

विकासकामे होत असताना काही गोष्टींसाठी गैरसोय होणार. भुयारी गटारे होत असताना रस्त्यावर खड्डे हे पडणारच. काम पूर्ण झाल्यावर रस्ते चांगले होतील, असेही खासदार तटकरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी रोहा तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेश कोल्हाटकर, समीर सकपाळ, अहमद दर्जी, नगरसेवक राजेंद्र जैन, अजित मोरे, मजिद पठाण आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply