उरण ः वार्ताहर
गणपती बाप्पांचे आगमन सोमवारी (दि. 2) होत असल्याने पेणच्या सुप्रसिध्द गणपतीमूर्ती सुंदर, सुबक असल्याने भारतात व परदेशात या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे अलिबाग, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे मागणी वाढली आहे. उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणपती मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. सालाबादप्रमाणे किशोर जगे यांचे श्री सिद्धीविनायक कला केंद्र येथे सुप्रसिध्द व सुबक मूर्ती आल्या असून उरण शहरात विविध ठिकाणी विनीत आर्ट कलाकेंद्र, गणपती कलाकेंद्र , चिन्मय कलाकेंद्र, रिद्धीसिद्धी कलाकेंद्र, लंबोदर कलाकेंद्र, गणेश कलाकेंद्र, एकदंत कलाकेंद्र, विघ्नहर्ता कलाकेंद्र व किशोर जगे यांचे श्री सिद्धीविनायक कलाकेंद्र आदी ठिकाणी पेणच्या सुप्रसिध्द गणेशमूर्ती विक्रीसाठी आले आहेत. गणेशभक्त आपल्या पसंतीची गणेशमूर्ती बुकिंग करतांना दिसत आहेत. त्याचप्रमाणे गौरीच्या सुबक मूर्तीही विक्रीस आल्या आहेत. मूर्ती आकर्षक दिसाव्यात, यासाठी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मूर्ती सजविण्यात कारागीर मग्न झाले आहेत. पूर्वी गावागावात मातीच्या गणपती मूर्ती बनवीत असत. आता पद्धत बदलली आहे. शाडूच्या मातीचे गणेशमूर्ती बनविणारे कारागीर मिळत नाहीत, विजेचा खेळखंडोबा, विजेचा अनियमितपणा, लोडशेडिंग, मातीचे भाव, रंगांचे भाव, कामगारांची कमतरता हे सर्व पाहता रेडीमेड पेणचे सुप्रसिध्द गणपती आणणे सर्वच पसंत करतात. आम्ही गेली 27 वर्षे आणतो गणेशभक्तांच्या आवडीनुसार मूर्ती विविध अलंकारांनी सजविल्या जातात. हिर्याचे कडे लावणे, विविध आकर्षक अलंकार लावणे, असे कलाकुसरीचे काम अक्षया पाटील, यामिनी माळवी काम करीत आहेत, असे किशोर जगे यांनी सांगितले.