यूएस ओपनमध्ये कडव्या झुंजीनंतर पराभव
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुरुष एकेरीत महान खेळाडू रॉजर फेडररसमोर पराभव पत्करावा लागला. कडवी झुंज देत 6-4, 1-6, 2-6, 4-6ने नागल हरला, पण त्याने पहिला सेट जिंकून आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सुमित नागल हा पहिल्यांदाच रॉजर फेडररसमोर टेनिस कोर्टमध्ये उभा ठाकला होता. इतक्या बलाढ्य खेळाडूविरोधात अमेरिकन ओपनसारख्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणे हे मोठी गोष्ट होती, पण सुमित जरासाही न घाबरता या आव्हानाला सामोरा गेला. इतकेच नव्हे तर त्याने सलामीच्या सेटमध्ये फेडररला 6-4 अशी धूळही चारली. त्याने पहिला सेट जिंकल्यानंतर सार्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
फेडररसारख्या खेळाडूसोबत पहिल्याच सामन्यात पहिला सेट जिंकणे हे खूप मोठी बाब होती. त्यामुळे तो सार्यांच्याच चर्चेचा विषय बनला, पण फेडररने त्यानंतर आपला दमदार खेळ दाखवून दिला. त्याने दुसरा सेट 6-1 असा जिंकत जोरदार पुनरागमन केले. त्या सेटमध्ये सुमितला फारसा प्रतिकार करता आला नाही. तिसर्या सेटमध्येही फेडररने आपला जलवा दाखवत 6-2 असा सेट खिशात घालून सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये सुमितने फेडररला पुन्हा निकराची झुंज दिली. फेडरर सहज विजय मिळवेल असे वाटत असताना सुमितने त्याला चांगलेच झुंजवले, पण अखेर भारताच्या सुमितला पराभवाचा सामना करावा लागला.
सुमितबरोबरच भारताचा प्रज्ञेशही अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळत आहे. भारताचे दोन खेळाडू एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीत खेळण्याची ही 1998नंतरची पहिलीच वेळ आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत
खेळायला मिळणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. पात्रता फेरी जिंकून सुमितने यूएस ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले.
22 वर्षीय सुमित हा मूळचा हरियाणाचा आहे. 20 ग्रँड स्लॅम जिंकणार्या दिग्गज फेडररसमोर टिकाव लागणे ही सोपी गोष्ट नसतानाही सुमितने या सामन्यात अखेरपर्यंत चिवट झुंज दिली. सुमितचा पराभव झाला असला तरी फेडररसारख्या बलाढ्य टेनिसपटूला विजयासाठी झुंजवल्याबद्दल सुमितचे कौतुक होत आहे.