Breaking News

तिसर्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

अलिबाग : प्रतिनिधी

मानसिक आजाराला कंटाळून एका रुग्णाने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सादिक महंमद सय्यद (46) असे उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. सादिक सय्यद हे तीन दिवसांपासून अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसिक आजारावर उपचार घेत होते. मानसिक रुग्ण असल्याने त्यांना एकटे सोडले जात नव्हते. सोमवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सादिक हे कोणासही न सांगता वॉर्डमधून बाहेर पडले आणि तडक रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर जाऊन वरून खाली उडी मारली. खाली असलेल्या लादीवर आपटून सादिक हे गंभीर जखमी झाले. रुग्णाने उडी मारल्याची बातमी कळताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू झाली. गंभीर जखमी झालेल्या सादिक यांना त्वरित मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. मुंबई येथे नेताना वाटेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुन्हा अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उपचार घेत असलेल्या रुग्णाने उडी मारून आत्महत्या केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सादिक हे वॉर्डच्या बाहेर जाताना तेथील कर्मचार्‍यांनी त्यांना बघितले कसे नाही, असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply