Breaking News

ग्रामीण मुलींना स्वसंरक्षणाचे धडे; 200 विद्यार्थिनींना प्रशिक्षण

पनवेल ः प्रतिनिधी

टाटा स्टील बीएसएलने जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमधील मुलींना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  आजच्या काळात मुलींच्या सक्षमतेसाठी अतिशय आवश्यक असा हा समाजोपयोगी उपक्रम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने राबविला जाणार आहे.

जमशेदपूर येथे आशिया खंडातील पहिल्या स्टील प्रकल्पाच्या उभारणीत ज्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली असे मूळ कंपनी टाटा स्टीलचे पहिले अध्यक्ष सर दोराबजी टाटा यांच्या 160व्या जयंतीचे औचित्य साधून पहिल्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तहसीलदार कार्यालय येथील सरनोबत नेताजी पालकर सभागृह येथे हे शिबिर पार पडले. रायगड जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या जवळपास 200 विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार आणि खोपोली येथील टाटा स्टील बीएसएलचे कार्यकारी प्लांटप्रमुख कपिल मोदी यांनी औपचारिकरीत्या या मोहिमेची सुरुवात केली.

मुंबईस्थित स्वयंसेवी संस्था स्वयंसिद्धा ही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या कामात बर्‍याच काळापासून कार्यरत असून टाटा स्टीलच्या या उपक्रमात त्यांचेही सहकार्य लाभत आहे. येत्या काही महिन्यांत दर पंधरवड्याला सावरोली, देवनहावे, खालापूर आणि खोपोली या रायगड जिल्ह्यातील भागांमध्ये पौगंडावस्थेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील. याबरोबरीनेच स्वयंसिद्धा संस्थेने करिअरविषयक सल्ला, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी चर्चा, व्याख्याने यासंदर्भातही बरेच काम केलेले असल्याने मुलींना त्यांच्या या सेवांचाही लाभ होईल.

या उपक्रमाचे कौतुक करताना चप्पलवार यांनी सांगितले, स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींमधील आत्मविश्वास वाढेल व करिअरविषयक सल्ला मिळाल्याने त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत हातभार लागेल. 

या वेळी मोदी म्हणाले की, टाटा स्टील बीएसएल नेहमीच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते.  शिक्षण, आरोग्य व रोजगार यावर आमचा विशेष भर असतो.  स्थानिक शाळांत आम्ही राबविलेल्या अनेक उपाययोजनांनंतर आता आम्ही ही प्रशिक्षण शिबिरे आयोजित करीत आहोत. येत्या काही महिन्यांत आजूबाजूच्या गावांमधील जवळपास 2000 मुली या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वसंरक्षणासाठी सक्षम बनतील.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply