पोलिसांत तक्रार; टेंबरे ग्रामपंचायतीतील घटना
कर्जत : बातमीदार
तालुक्यामधील टेंबरे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील एका फार्महाऊस मालकाने ग्रामपंचायतची बनावट कागदपत्रे आणि शिक्के तयार केले असल्याचे उघड झाले आहे. घरपट्टी आकारण्यासाठी आल्यानंतर संबंधित कागदपत्रे बोगस असल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतीने त्या सर्व बोगस कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी कर्जत येथील पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे. टेंबरे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील शिंगढोळ येथील जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता आणि जमीन बिनशेती न करता घराचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम करणारे सुनील माणिक पाटील हे घरपट्टी आकारून घेण्यासाठी 5 फेब्रुवारी 2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर खरी माहिती समोर आली आहे. घरपट्टी आकारून मिळण्यासाठी पाटील यांनी जी कागदपत्रे दिली होती, त्यात वीज घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आणि घराचे असेसमेंट उतारेदेखील होते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामधील कर्मचारी संभ्रमित झाले. त्यांनी ही बाब सरपंच दीपाली पिंगळे यांच्यासमोर ठेवली. त्या वेळी त्यांनी सुनील पाटील यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बिनशेती परवानगी मागितली, पण अशी कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीचे बोगस लेटरहेड व बनावट शिक्के बनवून फसवणूक करणार्या सुनील पाटील यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय टेंबरे ग्रामपंचायतीने घेतला. त्यानुसार रजपे ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली पिंगळे, उपसरपंच संतोष निलधे, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिद, ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कर्जत येथील कार्यालयात जाऊन तक्रार दिली.