
अलिबाग ः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनजागृती कार्यक्रमासाठी रवाना पथकाचे श्रीफळ वाढवून तसेच हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले, तसेच प्रत्यक्ष मतदारांना मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर, त्यासोबत असणार्या व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्र, गर्दीची ठिकाणे, बाजार आदी ठिकाणी हे जनजागृती पथक नागरिकांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट याबाबत माहिती देईल. या वेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती यांचीही उपस्थिती होती.