Breaking News

‘सुवर्ण’ सिंधू

भारतीय क्रीडा क्षेत्रात मागील काही महिने चांगल्या बातम्या येत आहेत. दुती चंद, हिमा दास, मोहमद अनास यांनी पदके जिंकली. पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात जगज्जेता खेळाडू तयार होतात ही भारताच्या दृष्टीने चांगली बाब आहे.

भारतात क्रिकेटला राजमान्यता आहे. औद्योगिक जगताचे पाठबळ आहे. त्यामुळे क्रिकेटला चांगले दिवस आहेत. हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले की त्याची चर्चा होते, परंतु वैयक्तिक खेळांमध्ये भारतीय खेळाडू क्वचितच पदक मिळवतात. प्रतिकूल परिस्थितीतदेखील हे खेळाडू खेळतात आणि पदके मिळवतात. वैयक्तिक खेळात गुणवत्ता, जिद्द, चिकाटीचा कस लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्य राखणे कठीण असते. त्यामुळेच सिंधूने मिळवलेल्या  सुवर्णपदकाचे मोल जास्त आहे.

सिंधूने  हे यश तिच्या जिद्दीने मिळवले आहे. गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये सिंधूने प्रवेश घेतला तेव्हा ती अवघी सहा वर्षांची होती. ती सिकंदराबादमध्ये राहायची आणि गोपीचंद यांची अकादमी हैदराबादला होती. हे अंतर 30 किमी होते. दररोज ती सायंकाळी आपल्या वडिलांसोबत एवढा प्रवास करून सराव करण्यासाठी जायची. गोपीचंद यांनी सिंधूतील गुणवत्ता हेरली.  तिला घडवले. गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये  सायना नेहवाल, परुपल्ली कश्यप हे सिंधूपेक्षा सीनिअर खेळाडू झाले. त्यांना जे जमले नाही ते सिंधूने करून दाखविले. सिंधूने जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. सिंधूच्या खात्यात आता ऑलिम्पिक रौप्य, विश्वविजेतेपद स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके, आशियाई खेळांमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि मानाच्या वर्ल्ड टूअर फायनलचे जेतेपद जमा आहे.

2016मध्ये सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. त्यानंतर तिने मोठ्या स्पर्धा जिंकाव्या आणि खेळात सातत्य ठेवावे अशी तिच्याकडून अपेक्षा होती, पण मधल्या काळात तिच्याकडून ती पूर्ण झाली नाही. विश्वविजेतेपदाची स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकच्या खालोखाल महत्त्वाची स्पर्धा. जगातील सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असतात. अशा खेळाडूंवर मात करणे सोपे नसते. त्यासाठी चिकाटी लागते. शारीरिक तंदुरुस्ती लागते. 2017पासून मागची तीन वर्षे सिंधूने या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. सिंधूने या स्पर्धेत सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली. सलग दोन वेळा अंतिम फेरीत  पराभूत झाली. 2019मध्ये इंडोनेशियन ओपन वगळता एकही स्पर्धा ती जिंकू शकली नव्हती. त्यामुळे तिचा फॉर्म हरवल्याचीही चर्चा झाली. तिच्यावर टीका होऊ लागली, पण तिने जिद्द सोडली नाही. तिसर्‍या प्रयत्नात तिने जागतिक स्पर्धा  जिंकली. अंतिम फेरीत सिंधूने जपानच्या  नझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सहज पराभव केला आणि तोही 38 मिनिटांमध्ये.  दोन वर्षांपूर्वी नझोमीनेच अंतिम फेरीत सिंधूला पराभूत केले होते. या पराभवाचा वचपा सिंधूने काढला. 5 फूट 10 इंच इतकी उंचीच्या या भारतीय खेळाडूने बॅडमिंटनमधील चिनी, कोरियन आणि जपानी वर्चस्वाला धक्का दिला. भारतीय बॅडमिंटनमध्ये जगज्जेत्या खेळाडूचा जन्म झाला आहे. 2016  साली रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत सिंधूला पराभूत व्हावे लागले होते. तिला

रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. 2020साली टोकियोत ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत ती सुवर्णपदक मिळवेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

प्रकाश पदुकोण, विश्वनाथ आनंद, पुलेला गोपीचंद, लिएंडर पेस, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी वैयक्तिक खेळांमध्ये भारताला पदके मिळवून दिली आहेत. या खेळांना राजमान्यता नसताना, औद्योगिक जगताचे सहकार्य नसताना या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. 1996पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदके मिळत आहेत. एशियाड, राष्ट्रकुल या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना पदके मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामागे या खेळाडूंचे कष्ट आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग आहे. भारतात क्रिकेटचे वेड पाहता इतर खेळांमध्ये विश्वविजेते निर्माण होत आहेत. हिमा दास, पी. व्ही. सिंधूसारखी क्रीडरत्ने या देशात निर्माण होत आहेत. ही भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी चांगली बाब आहे. सिंधूने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांतही आपण यश मिळवू शकतो हे दाखवून दिले आहे. हिमा दास व सिंधू या खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन भविष्यात मुले या खेळाकडे वळतील. त्यातून चांगले खेळाडू तयार होतील. चांगले खेळाडू शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी सरकारची आहे. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवल्यांनतर त्याचे अभिनंदन करायलाच हवे. त्याचबरोबर या खेळाडूला चांगल्या सुविधा कशा मिळवून देता येतील याकडेही शासनाने लक्ष दिले पाहिजे.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply