Breaking News

स्मरणशक्तीला द्या चालना!

स्मरणशक्ती ही प्रत्येकाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे, मात्र काही जणांची स्मरणशक्ती तीव्र असते, तर काही जणांची कमकुवत. प्रयत्न करून कमकुवत स्मरणशक्ती सुधारता येणं शक्य आहे. भारतातील सध्याची शिक्षण आणि परीक्षापद्धती ही स्मरणशक्तीला महत्त्व देणारी आहे. त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या प्रत्येकासाठी स्मरणशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. चांगली स्मरणशक्ती नसेल, तर केलेला अभ्यास लक्षात राहणार नाही. परिणामी, परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत. ती कशी सुधारता येऊ शकते याचा सर्वांनी साकल्याने विचार करावा.

परीक्षा संपल्यावर त्यांच्यापैकी काही जण म्हणतात की, अरे, मी परीक्षेच्या वेळी अमुक प्रश्नाचं उत्तर विसरलो, पण आता मला ते नीट आठवतंय. याचं कारण कदाचित परीक्षेमुळे त्यांच्यावर येणारा ताण असू शकतं. जेव्हा ताणतणावाची परिस्थिती येते, तेव्हा बहुतांश व्यक्ती काही काळासाठी, तेवढ्या काळासाठी गोष्टी विसरतात आणि जेव्हा तणावाचा हा काळ (म्हणजे परीक्षा) संपतो तेव्हा त्यांना आपण केलेला अभ्यास पुन्हा आठवायला लागतो. म्हणजे स्मरणशक्ती पुन्हा एकदा कार्यरत होते. सखोल, गुंतागुंतीचं वाचन केल्यामुळे स्मरणशक्ती चांगली, प्रखर होण्यास मदत मिळते, पण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही प्रक्रिया लागू पडेल, अशी खात्री देता येत नाही.

आपण केलेला अभ्यास आपल्या किती लक्षात राहतो, त्याचबरोबर तो आपल्याला किती समजला आहे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी केलेल्या अभ्यासाची वारंवार उजळणी करणं महत्त्वाचं असतं. उजळणी केली नाही, तर आपल्याला समजलं आहे या आपल्या अतिआत्मविश्वासामुळे कधी-कधी आपली फजिती होण्याचीही शक्यता असते. आपल्याला आपल्या स्मरणशक्तीवर आणि अभ्यास समजून घेण्याच्या क्षमतेवर कितीही विश्वास असला, तरी उजळणी करून त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. उजळणी करणं म्हणजे, पोपटपंची करणं नव्हे तर आपल्याला ती माहिती किती समजली आहे हे जाणून घेणं. यशस्वी उजळणीचा मार्ग म्हणजे आपण करत असलेल्या माहितीचा, अभ्यासाचा आणखी विस्तार करणं, सुधारणा करणं म्हणजे तुम्ही अभ्यासलेल्या माहितीला आलेख, स्टॅटिस्टिक्स, आकृत्या किंवा चित्रांची जोड देणं. परिणामी, तुमचा परफॉर्मन्स आणखी सुधारेल आणि त्याचा फायदा तुम्हालाच होईल.

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी निमॉनिक्स (अक्षरांची अशा प्रकारची रचना किंवा कल्पना ज्याद्वारे एखादी गोष्ट लक्षात राहणं शक्य होईल) या तंत्राचाही तुम्हाला अवलंब करता येईल. अशा प्रकारची तंत्रं साधारणपणे ठराविक अशी माहिती लक्षात राहण्याच्या दृष्टीनं बनवण्यात आलेली असतात. यात शब्द किंवा चित्रांची पद्धतशीर अशी रचना केलेली असून त्यांचा संघटित संच असतो. एखादी गोष्ट, माहिती लक्षात ठेवण्याच्या दृष्टीनं, लाँग टर्म मेमरी विकसित करण्याच्या दृष्टीनं या तंत्रांचा उपयोग होतो. उदाहरण म्हणून सांगायचं, तर काही ठराविक माहिती जाहिरातीतली जिंगल्सप्रमाणे तयार केली असता, ती पटकन लक्षात राहते आणि दीर्घ काळापर्यंत स्मरणात राहते.

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी काही टीप्स

* माहिती लक्षपूर्वक वाचा.

* पुनरावृत्ती करा.

* माहिती योग्य प्रकारे संग्रहित करा.

* माहितीचे नियोजन करून ती लक्षात ठेवा.

* काही ठरावीक खुणा किंवा

    सूचनांचा वापर करा.

* माहिती लक्षात ठेवण्यासाठी विविध        साधनांची मदत घ्या.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply