विविध रस्त्यांमुळे दळणवळण होणार सुकर -नगराध्यक्ष प्रीतम पाटील

पेण : प्रतिनिधी
पेण शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, याकरिता माजी मंत्री रविशेठ पाटील अहोरात्र झटत आहेत. पेणचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे त्यांचे सातत्याने लक्ष लागून राहिले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगर परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्षा पाटील यांनी पुढे सांगितले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बाह्यरस्ते विकास योजनेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 53 कोटींचा निधी पेण नगर परिषदेला दिला आहे. यातून पालिका हद्दीतील आगरी समाज हॉल ते मोतीराम तलाव तीन कोटी, मोतीराम तलाव ते सर्व्हे नं.392 (कॅनल)पर्यंत या भागातील 18 मी. रुंदीचा रस्ता तयार करणे यासाठी 4.98 कोटी, सर्व्हे नं. 392(कॅनल) ते बोरगावकडे जाणारा या भागातील 18 मी. रुंदीचा रस्ता तयार करणे 4.97 कोटी, बोरगाव रस्ता ते हिमास्पन पाईप कंपनी या भागातील 18 मी. रुंदीचा रस्ता तयार करणे 4.99 कोटी, राष्ट्रीय महामार्ग 17 ते भुंडा पुलाकडे जाणारा रस्ता तयार करणे 4.98 कोटी, का. रा. पाटील गणपती कारखाना ते नगर परिषद स्मशानभूमी या भागातील रस्ता तयार करणे 4.99 कोटी, विश्वेश्वर मंदिर ते नगर परिषद जॅकवेल या भागातील रस्ता तयार करणे 4.99 कोटी, जॅकवेल ते आरटीओ कार्यालय या भागातील रस्ता तयार करणे 4.99 कोटी, अंतोरा फाटा ते पंचायत समिती ते राष्ट्रीय महामार्ग क्र.66 पर्यंत रस्ता तयार करणे यासाठी 14.99 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. याशिवाय अंतर्गत रस्त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून दोन कोटी, तर नाट्यगृहासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून, या बाह्यरस्त्यामुळे पेण शहरात वाहतूक कोंडी होणार नाही, तसेच पालिकेच्या उत्पन्नातदेखील मोठी वाढ होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.