Breaking News

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे -डॉ. अविनाश पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश पाटील यांनी केले आहे. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 27) मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. अविनाश पाटील यांनी याप्रसंगी मराठी भाषेबद्दल बोलताना सांगितले की, मराठी भाषा ही शेती, माती व नाती जपण्याचे काम करते. ही अत्यंत प्राचीन भाषा असून ती इ.स.पूर्व चौथ्या व पाचव्या शतकातील आहे. ही भाषी खूप सुंदर आणि भावनेशी निगडित आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. मराठी भाषेला महाराष्ट्रातील संतपरंपरेने प्राकृत भाषेमध्ये लिखाण करून तिची जगाला ओळख करून दिली व  तिला सन्मानीत केले. मराठी भाषेचा हा दर्जा व सन्मान टिकविण्याचे काम हे आपल्या सर्वांचेच आहे, असे सांगत त्यांनी एक खंतही व्यक्त केली. ती म्हणजे 21व्या शतकामध्ये मराठी भाषिकच  मराठी विसरत चालले आहेत. मराठी शाळांमध्ये अमराठी मुले शिकत आहेत. अविनाश पाटील यांनी या वेळी स्थानिक प्रश्नांवर आधारित सामाजिक कविता सादर केल्या. त्यामध्ये त्यांनी स्थानिकांच्या विस्थापनाने  होणार्‍या वेदना हळुवारपणे आपल्या काव्यामध्ये मांडल्या. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी  आपल्या भाषणात तरुणांची भाषेप्रति असणारी जबाबदारी व कर्तव्य स्पष्ट करीत कुसुमाग्रजांच्या कवितेतील सामाजिक आशयावर मत व्यक्त केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. ए. डी. आढाव, उपप्राचार्य जी. जे. कोराणे, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेनिकर यांनी, तर आभार प्रा. चिंतामण धिंदळे यांनी मानले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply