Breaking News

गेलचा नवा विक्रम

500 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

सेंट जॉर्ज : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरूच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली, मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही आणि त्यांना हा सामना गमवावा लागला, पण गेलने षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

39 वर्षीय गेलने 97 चेंडूंमध्ये 162 (14 षटकार, 11 चौकार) धावांची जबरदस्त खेळी केली. एकदिवसीय कारकिर्दीत 25व्या शतकी खेळीत गेलने सामन्यातील आठवा षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी + एकदिवसीय + ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय) 500 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करणारा पहिला फलंदाज बनला. गेलने आतापर्यंत कसोटीमध्ये 98, एकदिवसीय सामन्यात 305 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 103 षटकार लगावले आहेत.

यासोबतच ख्रिस गेलने (10,074 धावा) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या 10 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत ब्रायन लारानंतर (10,405) 10 हजार धावांचा आकडा पार करणारा वेस्ट इंडिजचा दुसरा कॅरेबियन फलंदाज ठरला आहे. एकूण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांबाबत बोलायचं झालं, तर 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो चौदावा फलंदाज ठरला आहे.

ख्रिस गेलने 85 चेंडूत आपल्या 150 धावा पूर्ण केल्या. संघ पराभवाच्या छायेत असताना एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद दीडशे धावा करण्याचा विक्रम गेलने केला. त्याने रिकी पॉण्टिंगला मागे टाकलं, पॉण्टिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये 99 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला होता. पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथ्या मुकाबल्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडच्या संघाने 6 बाद 418 धावा अशी धावसंख्या केली. 

418 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने 44 धावांवर आपले दोन फलंदाज गमावले, पण गेलचा प्रहार सुरूच होता. त्याने तिसर्‍या विकेटसाठी डॅरेन ब्राव्होसह (61 धावा) 176 धावांची भागीदारी रचली, पण ती अपयशी ठरली. 295 धावसंख्येवर बाद होणारा गेल पाचवा फलंदाज होता. अखेरीस संपूर्ण संघ 389 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने हा सामना 29 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात वेस्ट इंडिजने 22 षटकार ठोकले, तर या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 षटकार ठोकले होते.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply