रायगड शाखेच्या गुन्हे शाखेने केली अटक
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोडी करणार्या अट्टल गुन्हेगारास रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण 11 गुन्हे उघडकीस आले असून 15 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संकेत मुकुंद आंजर्लेकर असे आरोपीचे नाव असून तो इलेक्ट्रिकल इंजिनियरचा डिप्लोमाधारक आहे. तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून तात्पुरता नोकरीस आहे.
मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे वाढीस लागले होते. त्यामुळे सामान्य माणसाबरोबरच पोलीस यंत्रणा चिंतेत होती. पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याचा गांभीर्याने विचार करून स्थानिक गुन्हे शाखेची खास पथके पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली. या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याचे आदेश यंत्रणांना दिले.
गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्याकडे दापोलीतील आरोपी संकेत आंजर्लेकर याची माहिती होती. हा पोलीस रेकॉर्डवरील अशा अनेक गुन्ह्यांतील रेकॉर्डवर होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. महाडमधील 6, गोरेगावमधील 2, तळा 2, तर माणगावमध्ये 1 गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यांमध्ये दागिने आणि रोख रक्कम मिळून 19 लाख 53 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैकी 15 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकूण 77 टक्के मालमत्ता हस्तगत केल्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहायक फौजदार गिरी, हवालदार शामराव कराडे, प्रशांत दबडे, अमोल हंबीर, अनिल मोरे, अक्षय पाटील, अक्षय जगताप, जयश्री पळसकर यांनी ही कामगिरी बजावली.