Breaking News

महाड-तुळशीखिंड-खेड रस्ता खचला

महाड : प्रतिनिधी

कशेडी घाट मार्गाला पर्याय असलेला महाड-विन्हेरे-तुळशीखिंड -नातुनगर-खेड हा रस्ता गुरुवारी (दि. 5) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला खचल्याने हा रस्ता वाहातुकीला पूर्ण बंद झाला आहे. सुमारे वीस फूट रुंदीचा खड्डा पडल्यामुळे मोटारसायकलदेखील या रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने नातुनगर मार्गाने जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 2005 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कशेडी घाटांत दोनशे मिटर लांबीचा मातीचा भराव कोसळल्याने कोकणातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग 15 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद करण्यात आला होता. त्यावेळी या महामार्गाला महाड-तुळशीखिंड-खेड हा रस्ता पर्याय असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर खेड तालुक्यातील नातुनगर, तुळशीखिंड आणि महाड तालुक्यातील विन्हेरे रस्त्याचे काम करण्यात आले. सुमारे 20 कोटी रुपये खर्च करुन हा रस्ता तयार करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बहिर यांनी तुळशीखिंड रस्ता सुरक्षित असल्याचे सांगितले होते. मुसळधार पावसामुळे गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला तुळशीखिंडदरम्यान फाळकेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये धनगरवाडीजवळ या रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा खड्डा आकाराने मोठा असल्याने या मार्गावरून दुचाकीदेखील जाऊ शकणार नाही. गौरी गणपती विसर्जनानंतर शनिवारपासून कोकणातील चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. महाड तुळशीखिंड खेड रस्त्याने प्रवास केल्यास अंतर 11 किलोमीटरने कमी होते तसेच धोकादायक कशेडी घाट आणि त्या घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका होते. म्हणून खेड, दापोली आणि चिपळूणमधील अनेक प्रवासी महाड-तुळशीखिंड-खेड या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असताना दिसतात. त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निलेश ताठरे, पंचायत समितीचे माजी सभापती सीताराम कदम आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दरेकर यांनी केली आहे.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply