अलिबाग ः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण झाली आहे. मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती रायगडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती या वेळी उपस्थित होते.
निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणांच्या विभागवार बैठका पूर्ण झाल्या आहेत. मतदान केंद्र निश्चिती तेथील पायाभूत सुविधा, आवश्यक बंदोबस्त याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्ह्यात पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त कार्यान्वयित केला जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघासाठी एक केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव दल, शीघ्र कृती दलाची पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सहा मतदारसंघात..
जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, आलिबाग, श्रीवर्धन व महाड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पुरुष 11 लाख 52 हजार 911 व महिला 11 लाख 12 हजार 563, 4 तृतीयपंथी असे 22 लाख 65 हजार 478 सर्वसाधारण सेच सर्व्हिसमधील 1201 असे जिल्ह्यात एकूण 22 लाख 66 हजार 679 मतदार आहेत. त्यात 28 हजार 738 नवीन मतदारांचा समावेश आहे. 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत. मतदार संख्येच्या 39.89 टक्के मतदार हे 18 ते 19 वयोगटातील आहेत. 21 लाख 38 हजार 45 मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले आहे. 96.19 टक्के मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन हजार 693 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात 5012 बॅलेट युनिट, 3590 कन्ट्रोल युनिट आणि 3886 व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध आहेत.
रायगड जिल्ह्यात 28 हजार 738 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली, मात्र ज्या मतदारांनी अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही. त्यांनी आपली नावे मतदारयादीत नोंदवून घ्यावीत.
-डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी