Breaking News

आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई; सुधागडातील दांड कातकरवाडीतील महिलांची घोटभर पाण्यासाठी वणवण

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, दांड कातकरवाडीतील लहानग्यांसह वृद्ध महिलांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात फरफट होत असल्याचे चित्र दिसून येतंय. उन्हाळ्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी नदी, विहिरी, तलावांतील पाण्याचा वापर केला जात आहे. बोअरवेलच्या माध्यमातूनही काही गावांची तहान भागविली जात आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जलस्थर खालावल्याने नदी, विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. तर बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम सुधागड तालुक्याच्या दुर्गम भागातील तसेच डोंगरावरील आदिवासी वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दांड कातकरवाडीत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, तेथील रहिवाशांना पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. येथील माया पवार यांनी सांगितले की, मला या वाडीत 15 वर्ष झाले, मात्र अजूनही पाण्यासाठी  कोसोदूर चालत जावे लागत आहे, इथली बोरिंग मोडले, नळाला पाणी नाही, म्हणून पाण्यासाठी आमचे हाल होतात. तर अस्मिता वारे ही सहा वर्षाची मुलगी म्हणाली की, पाण्यासाठी मला रोज डोक्यावर हंडा घेऊन चढ उतार करावे लागते, त्याचा खूप त्रास होतो. काही आदिवासी बांधवांना पाण्यासाठी जवळपासच्या फार्महाऊस मालकांवर अवलंबून राहत आहेत, त्यांनी दिलेल्या पाण्यावर त्यांना तहान भागवावी लागते.सकाळी व संध्याकाळी पाणी मिळवताना दिवस जातो, कामाला जाता येत नाही. येथील फार्महाऊसवाल्यांच्या मेहरबानीवर आमचं चाललं आहे, ते जोवर पाणी देतात तोवर ठीक नाहीतर पाण्यासाठी अजून हाल सोसावे लागतील, अशी व्यथा येथील लक्ष्मीबाईने सांगितली.   

तालुक्यातील आदिवासी वाड्या पाड्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने प्राप्त अहवालानुसार  जिल्हाधिकार्‍यांकडे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा पर्याय अवलंबिला आहे. ज्या वाड्या पाड्यावर पाणीटंचाई आहे, त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माहिती द्यावी. तेथे पाणीपुरवठा करण्यात येईल. -दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली सुधागड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply