Breaking News

संपर्क तुटला, संकल्प नाही

रॉकेट, उपग्रह, ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हरसारख्या शब्दांशी सामान्यांचा कधीच संबंध येत नाही. आयुष्यात विज्ञानातले कधीही काहीही न वाचलेल्या शब्दांची, गोष्टींची चांद्रयान-2 मोहिमेपासून लहानांपासून सर्वांनाच ओळख झाली. गरिबीच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने ही चांद्रमोहीम एका परिकथेसारखी आहे. चांद्रयान-2 मोहीम बहुतांशी यशस्वी झाली. अखेरच्या टप्प्यात विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला, पण अंतराळात झेप घेण्याचा, चंद्राला जाणून घेण्याचा भारताचा, इस्त्रोचा संकल्प तुटलेला नाही. नव्या पिढीला ही मोहीम प्रेरणा देईल हे मात्र निश्चित. या यशस्वी मोहिमेसाठी इस्त्रोच्या टीमचे कौतुक. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार्‍या पंतप्रधानांचेही आभार.

ज्या देशाची संपत्ती ब्रिटिश साम्राज्याने ओरबाडून घेतली होती त्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाने त्यावेळी अंतराळ विज्ञानावर पैसे खर्च करायचे ठरवले आणि यात मोठे यश मिळविले आहे. शुक्रवारी मध्यरात्री चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा होता. विकम लॅण्डर चंद्रावर उतरणार होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सारा देश जागा होता. देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी हा क्षण पाहण्यासाठी इस्त्रोच्या कार्यालयात हजर होते. काऊंडडाऊन सुरू झाले, पण विक्रम लॅण्डर उतरण्यासाठी काही क्षण असताना त्याच्याशी इस्त्रोचा असलेला संपर्क तुटला. सारा देश हळहळला. इस्त्रोचे प्रमुख सीवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोच्या टीमचे कौतुक केले. सर्वांना आशावादी राहण्याचा संदेश देऊन ते शांतपणे बाहेर पडले. आपली ही मोहीम 95 टक्के यशस्वी झाली. ऑर्बिटर अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत आहेत. विक्रमचे काय झाले हे कळले नाही, पण ही मोहीम शेवटची नाही. यापूर्वीही अशा अनेक मोहिमा अयशस्वी झाल्या, पण त्यातून उभारी घेत इस्त्रोने यशाचे टप्पे गाठले. विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला असला तरी मोहीम थांबलेली नाही. संपर्क तुटला पण संकल्प नाही.

काही दिवसांपूर्वी जेव्हा चांद्रयान-2चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले, तेव्हा काही अतिशहाण्या लोकांनी नावे ठेवली. पुढील दोन आठवड्यांतच इस्त्रोने चांद्रयान-2चे यशस्वीपणे प्रक्षेपण करून या लोकांच्या सणसणीत थोबाडीत मारली. वेगवेगळ्या प्रकारची विविध आव्हाने यशस्वीरीत्या पार करून शुक्रवारी (दि. 6) शेवटची रफ़ ब्रेकिंग, व्हर्टीकल डिसेंटच्या सगळ्यात कठीण फेज पूर्ण करून विक्रम रोव्हरची वेलोसिटी कमी करणार्‍या फाईन ब्रेकिंग फेजनंतर म्हणजे पृष्ठभागावर उतरायच्या 2.1 किलोमीटर आधी लॅण्डरचा इस्त्रोच्या डेटा सेंटरशी संपर्क तुटला. त्यामुळे रोव्हरबद्दल अजूनपर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही. या संपूर्ण मिशनची तीन भागांत विभागणी केली तर ऑर्बिटर मिशन यशस्वी होते. लॅण्डर ज्याला सॉफ्ट लँडिंग करायची होती त्याची फाईन ब्रेकिंगनंतरची परिस्थिती आपल्याला माहीत नाही. रोव्हरबद्दलही काहीच माहीत नाही. जरी ते उतरले असेल तरी कुठल्या परिस्थितीत याची काहीच कल्पना नाही.

डॉ. अब्दुल कलामांचे धीरूभाई अंबानी मेमोरियलमधील सन 2003मधील एक भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा त्यांनी अपयशावर कशी मात करायची यावर सुंदर अनुभव कथन केले होते. 17 ऑगस्ट 1979मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून डॉ. कलाम यांनी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे जेव्हा पीएसएलव्ही मिशन फेल होऊन 20 कोटींचे सॅटेलाइट बंगालच्या उपसागरात कोसळले, तेव्हा तत्कालीन इस्त्रो चीफ डॉ. सतीश धवन यांनी डॉ. कलाम यांना त्यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्समध्ये यायला सांगितले आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्या प्रश्नांना उत्तरे देत डॉ. धवन यांनी मिशनच्या अयशस्वितेची सगळी जबाबदारी

स्वतःच्या खांद्यावर घेतली, त्यांची कुठलीही चूक नसताना. पुढे एका वर्षाने 18 जुलै 1980 साली इस्त्रोने पीएसएलव्हीतून सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण करून दाखविले आणि त्या वेळी डॉ. धवन यांंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स न घेता डॉ. कलाम यांंना ती घ्यायला लावली. यशाचे अमृत आपल्या सहकारी शास्त्रज्ञांमध्ये वाटून अपयशाचे हलाहल डॉ. सतीश धवन स्वतः प्यायले होते. चांद्रयान-2 मोहिमेतील रफ़ ब्रेकिंगपर्यंतच्या सगळ्या घोषणा चांद्रयान-2च्या प्रोजेक्ट डायरेक्टर एम. वनिता स्वतः करीत होत्या. ब्रेकिंग फेजनंतर जेव्हा डेटा येणे बंद झाले तेव्हा पूर्ण टीमचे आणि पर्यायाने वनिता यांंचे मनोबल खचलेे होते. त्यांचे चेहरेच ते सांगत होते. के. सिवन यांनी टीमशी

विचारविनिमय केला. नंतर ते स्वतः पंतप्रधान मोदींना घटनेची माहिती द्यायला आले. मोदी त्यानंतरदेखील प्रेक्षक कक्षेत बसून होते आणि थोड्या वेळाने ते खाली आले. चेहरा उतरलेल्या सिवन यांना इस्त्रोच्या दोन माजी अध्यक्ष असलेल्या शास्त्रज्ञांनी दिलासा दिला. त्यानंतर मिशनची अधिकृत अशी विक्रमशी संपर्क तुटल्याची घोषणा के. सिवन यांनी स्वतः केली. पंतप्रधान मोदी यांंनी स्वतः खाली येऊन प्रोजेक्टमधील सगळ्या टीमला तुम्ही जे काही मिळवले आहे, ते खूप मोठे आहे. सगळ्या देशाला तुमचा गर्व आहे. यातूनही आपण शिकू, पुढे जाऊ आणि यशस्वी होऊ, हा मंत्र दिला. तो खरंच वाखाणण्यासारखा आहे.

यशाचे धनी अनेक असतात, पण अपयशाचे कुणीच धनी नसते. निराशेमुळे खांदे झुकलेल्या इस्त्रोचे चीफ के. सिवन यांंच्या पाठीवर मोदींनी सगळ्या मिशन टीमसमोर दिलेली थाप म्हणून अधिक विश्वासक आणि समाधानकारक आहे. याच राखेतून उद्या अवकाशात झेप घेणार्‍या नवीन मिशनचे धुमारे फुटतील. इस्त्रोच्या तंत्रज्ञ लोकांना काय टेन्शन असेल याची कल्पनाच केलेली बरी. इस्त्रोेच्या टीमचे टेन्शन तर माझ्या आभाळाइतके मोठे आहे. या मोहिमेनंतर अनेक गिधाडे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना चोचा मारायला टपलेली असतील, पण शुक्रवारी मध्यरात्री ज्याप्रकारे हजारो लोक हा सोहळा बघायला जागे होते आणि त्यानंतर सध्याच्या परिस्थितीवर लोक ज्याप्रकारे सोशल माध्यमांवर सकारात्मकरीत्या व्यक्त होत आहेत त्यावरून हे निश्चित की इस्त्रोबद्दल कुठल्याही नकारात्मक बाबीला लोकच थारा देणार नाहीत. एक गोष्ट बोल्ड आणि कॅपिटलमध्ये सिद्ध झाली की इस्त्रो ही जगातील सर्वांत बुध्दिमान संशोधन संस्था  आहे.

-योगेश बांडागळे, पनवेल

इस्त्रोच्या कामगिरीने जग अचंबित

भारतीय अवकाश संशोधन संस्था (खडठज) आज जगातील सर्वांत विश्वसनीय अवकाश संस्था आहे. जगभरातील जवळपास 32 देश इस्रोच्या रॉकेटच्या साहाय्याने आपले उपग्रह अवकाशात लाँच करतात. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीतून आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या योगदानातून नावारूपाला आलेल्या या संस्थेत अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी आणि तत्कालीन सरकारने मोलाची मदत केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी जेव्हा जेव्हा भारताच्या सीमाभागात घुसखोरी करून घातपाती कारवाया केल्या, तेव्हा तेव्हा इस्त्रोने भारतीय सेनेची मदत केली. 2016मध्ये पाकिस्तानव्याप्त उरीमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केला, तेव्हा इस्त्रोनेच आतंकवाद्यांचे तळ शोधून त्याची माहिती भारतीय सेनेला पुरवली होती. 2019च्या बालाकोट सर्जिकल स्ट्राइकमध्येही इस्त्रोने याच प्रकारे मदत केली. नोव्हेंबर 2007मध्ये रशियन अवकाश संस्था रॉसकॉसमॉसने चांद्रयान-2 प्रोजेक्टसाठी लॅण्डर देऊन सोबत काम करणार असल्याचे सांगितले होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी 2008मध्ये प्रोजेक्टला मान्यता दिली. 2009मध्ये प्रोजेक्टचे डिझाईन तयार करण्यात आले. जानेवारी 2013मध्ये लाँचिंग होणार होते, पण रॉसकॉसमॉस लॅण्डर देऊ शकली नाही. त्यानंतर इस्त्रोच्या भारतीय शास्त्रज्ञांनी कुठल्याही परदेशी मदतीशिवाय स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आणि नवीन लॅण्डर-रोव्हर बनवले. 1 फेब्रुवारी 2017 रोजी इस्त्रोनेे कार्टोसॅट-2 या भारतीय उपग्रहासोबतच विविध देशांचे 103 असे एकूण 104 उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करून दाखवला होता. भारतानंतर एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह अंतराळात पाठविणार्‍यांत रशियाचे नाव येते. त्यांनी 2014मध्ये 37 उपग्रह एकाच वेळी पाठवले होते. याची तुलना करता भारताने अवकाश विज्ञानात किती मोठी कामगिरी करून दाखवली याचा प्रत्यय येतो.

5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान मोहीम) लाँच केली. जगात भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने पहिल्या प्रयत्नातच मंगळयान मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. भारताच्या आधी रशिया, अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळयान यशस्वी केली आहे, मात्र त्यापैकी कुणालाच पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करता आली नव्हती, तसेच भारताची मंगळयान मोहीम इतरांच्या तुलनेत जगातील सर्वांत स्वस्त मोहीम ठरली. इस्त्रोने 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची पहिली चांद्रयान-11 मोहीम लाँच केली. 312 दिवस या यानाने इस्त्रोला चंद्रावरील माहिती आणि फोटो पाठवले. त्याआधारे भारताने जगाला पुराव्यासह सांगितले की, चंद्राच्या 70 ते 80 डिग्री अक्षांश ध्रुवीय भागात पाण्याचे कण अस्तित्वात असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकी अवकाश संस्था नासाने भारताच्या या दाव्याची पुष्टी केली आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.

‘विक्रम’

इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या नावावरून मून लॅण्डरला ‘विक्रम’ नाव देण्यात आले होते. भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांना जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने डूडल बनवून नुकताच सलाम केला आहे. यंदाचे वर्ष हे विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 या दिवशी झाला.  अहमदाबाद येथील एका कापड व्यापार्‍याच्या घरात विक्रम साराभाई यांचा जन्म झाला. त्यांचे घर तसे सुखवस्तू होते. त्यामुळे त्यांचे बालपण आनंदात गेले. इतके की त्यांचे शिक्षणही त्यांच्या कुटुंबीयांनी चालवलेल्या एका प्रयोगशील शाळेत झाले. त्या शाळेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती देणार्‍या प्रयोगशाळा होत्या. साराभाई वयाच्या 18व्या वर्षी केंब्रिज येथे शिक्षणासाठी गेले. साराभाई यांचे कौटुंबिक मित्र असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची शिफारस केली होती. विक्रम साराभाई अशा निवडक वैज्ञानिकांपैकी एक नाव आहे, जे आपल्या तरुण सहकार्‍यांना सदैव प्रोत्साहन देत असत. त्यांच्या या प्रोत्साहनाबद्दल सांगितले जाते की, ते एक यशस्वी लीडरही होते. साराभाई यांनी 1947मध्ये अहमदाबाद येथे भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा (झहूीळलरश्र ठशीशरीलह ङरलेीरीेीं) या संस्थेची स्थापना केली. साराभाई यांचे वडील एक उद्योगपती होते. तसेच झहूीळलरश्र ठशीशरीलह ङरलेीरीेीूं या संस्थेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतही केली होती. साराभाई यांना वयाच्या 28व्या वर्षी पीआरएलशी जोडले गेले, मात्र त्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्येच त्यांनी पीआरएलला जागतिक दर्जा मिळवून दिला. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ मोहिमेचे जणक म्हणूनही ओळखले जातात. त्यांना 1962मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 30 डिसेंबर 1971मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply