ग्रामस्थ भयभीत; प्रशासनाकडून कारवाईची मागणी
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणत शासनाने मुंबई येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या गावी कोकणात जाण्याची मुभा दिली खरी, पण ती आता गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण मुंबईहून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाइन करून त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे, परंतु काही बेजबाबदार नागरिक आम्हाला काहीच झाले नाही. फक्त आमच्या हातावर एक होम क्वारंटाइनचा शिक्का मारला आहे, असे सांगत रस्त्यावर तसेच खेड्यापाड्यातील आळ्यांमध्ये फिरून गावागावात प्रशासन व गावातील नागरिकांना चकवा देत आहेत. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चोरट्या मार्गाने प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकत मुंबई व पुणे या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या रेड झोनमधून काही नागरिक चालत येत असल्याचेही पाहायला मिळत आहे. बाहेरून आलेले काही नागरिक
स्वतःहून पुढे येऊन उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन या ठिकाणी तपासणी करून घेतात, तर काही जण गुपचूप आपल्या घरी जाणे पसंत करतात. तरी प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून होम क्वॉरंटाइन केले असतानाही रस्त्यावर व गावामध्ये फिरणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असून पनवेलमध्ये कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे पनवेल आणि उरण हे दोन तालुके रेड झोनमध्ये आहेत. पनवेल शेजारी असल्याने रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे नितांत गरजेचे आहे. रायगड जिल्ह्याच्या झोन निश्चितीबाबत संभ्रम कायम आहे. तरी काही दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यापुरत्या काही सोयीसुविधा थोड्या अधिक प्रमाणात सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु अजूनही काही नागरिक कोरोनाचे महाभयंकर संकट गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.