सेट युवर डेली गोल्स अॅण्ड डोन्ट स्टॉप टिल यू गेट द फायनल, या ओळी आहेत शुभम हरिभाऊ कुलकर्णी याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलवरच्या. आज त्या ओळी त्याने खर्या अर्थाने सार्थ ठरवल्या आहेत. शुभम मूळचा वडवळ ता. मोहोळ जि. सोलापूर गावचा. 2006साली वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून तो आपल्या आईसोबत मामाकडे (पापरी ता. मोहोळ) राहत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उद्यानविद्या (कृषी विषयाशी संलग्नित) पदवीचे शिक्षण त्याने 2014 ते 2018दरम्यान शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, खरवते (चिपळूण, जि. रत्नागिरी) पूर्ण केले आणि तब्बल एक वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर शिक्षक दिनाच्या उत्तरसंध्येला त्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे फ्रूट सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश मिळाला.
त्याने ही आनंदवार्ता दिली. तो खूप खूश होता. आवाजात प्रचंड आत्मविश्वास होता. आजचे यश हे एका लांबच्या प्रवासातील अगदी छोटेसे स्टेशन आहे. भविष्यातील आणखी मोठी आव्हाने पेलण्यासाठी मी सदैव तयार आहे, असाच काहीसा भाव त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. मी मात्र क्षणात चार वर्षे मागे गेलो. शुभमसोबतच्या सर्व आठवणी, त्याचा प्रामाणिक संघर्ष डोळ्यांपुढे उभा राहिला. शुभमचे वडील हरिभाऊ कुलकर्णी हे सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. त्यानंतर ते शेतीकडे वळले, परंतु 2006 साली त्यांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी आई सुनीता यांच्यावर आली. संघर्षाला सुरुवात खर्या अर्थाने इथूनच झाली. वडिलांच्या आजारपणात शेती विकली. अशा वेळी मामा संतोष दत्तात्रय हायदळे मदतीला धावून आले.शुभम आणि आपल्या बहिणीला स्वत:च्या घरी घेऊन गेले. तेव्हापासून शुभमची आई मामाच्या शेतात तर कधी दुसर्याच्या शेतात रोजंदारीवर कामाला जाऊ लागली.
दरम्यानच्या काळात शुभम पापरी गावातील जिपच्या शाळेतून 7वी तर पुढे स्व. सुरेशअप्पा भोसले विद्यालयातून 71 टक्के गुण मिळवून 10वी उत्तीर्ण झाला. पुढे 11वी सायन्स शाखेला मोहोळ येथील नागनाथ महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाले, परंतु पापरी ते मोहोळ प्रवासखर्चाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी तो शनिवार -रविवार आईसोबत दुसर्यांच्या शेतात कामाला जाऊ लागला. त्यातून मिळालेल्या पैशांतून एसटी पासचा खर्च निघत असे. बाकी फी व इतर खर्च आईच्या पगारातून भागत असे. यातच 12वी झाली. त्यात त्याला 64 टक्के मार्क मिळाले.
कृषी पदवीसाठी अर्ज केला. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पदवीचा खर्च मोठा होता. मामा वेळोवेळी मदत करतच होता, परंतु खर्च मोठा असल्याने सुरुवातीला त्यांनी विरोधच केला. तेव्हा त्याने मामाला शब्द दिला की, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जो माझ्यासाठी पैसा खर्च करत आहात तो मी कधीच वाया जाऊ देणार नाही. फक्त एकदाच ते शुभमला सोडायला कॉलेजवर गेले. त्यानंतरचा प्रवास मात्र शुभमने एकट्यानेच केला. अगदी डिग्री पूर्ण झाल्यावर आपले सर्व साहित्य घेऊन घरी जाईपर्यंत. महाविद्यालयीन खर्चासाठी आई बचत गटातून पैसे उचलायची आणि शुभमला पाठवायची. वर्षभर शेतात मजुरी करून ते पैसे फेडायचे व परत पुढच्या वर्षी नवीन कर्ज काढायचे. अशा प्रकारे चार वर्षे गेली आणि शुभम कृषी पदवीधर झाला. मागील वर्षभर तो पुणे येथे एचडीएफसी बँकेत नोकरीला आहे. स्वत:चा खर्च भागवून तो आईलाही थोडे पैसे पाठवतो. 9 ते 6 बँकेत काम करून सायं. 7 ते 11 अभ्यासिकेत जाऊन सीईटीचा अभ्यास असा त्याचा दिनक्रम सुरू होता. परीक्षा झाली.
राज्यातून तो 115वा आला आणि आता त्याला एमएससी अॅग्रीला प्रवेश मिळाला. सर्वप्रथम आईला ही बातमी दिली. आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वत:कडे लक्ष दे, खूप कष्ट कर, खूप मोठा हो, माझं काय म्हातारीचं, हितंच कुठल्यातर कोपर्यात आयुष्याची संध्याकाळ होईल, अशी आईने प्रतिक्रिया दिल्यावर ऊर भरून आल्याचे शुभम सांगतो. पूर्ण हयात हातात खुरपी घेऊन या माऊलीने दुसर्यांचे मळे सुंदर करता करता आपल्या मुलाचे आयुष्यदेखील उज्ज्वल केले आणि अजूनही करीत आहे. शुभमनेही आई व मामाचे कष्ट वाया जाऊ दिले नाही. त्याला भविष्यात मोठा अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी त्याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलप्रमाणे त्याने गोलही सेट केला आहे.
मी 2015 ते 2018दरम्यान सहायक प्राध्यापक म्हणून शुभमच्या कॉलेजवर कार्यरत होतो. शुभम माझा विद्यार्थी. वक्तशीरपणा, प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि चिकाटी हे त्याचे स्वभावगुण. शांत व एकटा राहणार्या शुभमचा संघर्ष पाहून मला माझेच दिवस आठवायचे. आज तो याचे सर्व श्रेय आपली आई, मामा व मला देतो. वास्तविक यातून त्याच्या मनाचा मोठेपणाच दिसून येतो. डिग्रीचे चार वर्षे त्याने प्रामाणिक कष्ट केले. वेळ वाया घालवण्यासारख्या बर्याच गोष्टी होत्या, परंतु कॉलेजच्या झगमगाटात तो आईचे दिवसरात्र राबणारे हात विसरला नाही. आपला रस्ता सोडला नाही. कुणाच्या मदतीची वाट पाहिली नाही, ना कोणाला मदत मागितली. स्वत:च्या गरजा कमी केल्या. अगदी एकवेळचे जेवणही त्याने स्कीप केले. आज जवळ पैसे असूनही तो एकवेळच जेवतो. याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला की, ही गोष्ट आता माझ्या सवयीचा भाग झाला आहे. खरंच कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती याचाच प्रत्यय त्याने आज अनेकांना दिला. शुभम तुझे हे यश तू केलेल्या प्रामाणिक संघर्षाचे फलित आहे, ज्याचे श्रेय फक्त आणि फक्त तुला व तुझ्या आईला जाते. आम्ही मात्र निमित्त होतो.
आज असंख्य शुभम या देशात भेटतील, जे आव्हानांच्या छाताडावर पाय देऊन यशाचा मार्ग शोधत आहेत. वाट भरकटलेल्या अशा अनेक अॅग्रीकॉसना तुझे हे यश पुढील काळात नक्कीच प्रेरणा देत राहील यात शंका नाही. आपल्या गावाचे, महाविद्यालयाचे नाव तू मोठे केले आहे. आम्हा सर्वांना याचा सार्थ अभिमान वाटतो. खर्या अर्थाने मला तुझ्याकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मिळाल्या. त्याबद्दल तुझे आभार. पुढील वाटचालीस तुला मनापासून शुभेच्छा.
-सुशांत शाहीर मोरे, कोल्हापूर