बंगळुरू : वृत्तसंस्था
चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) यश आले आहे. ‘चंद्रावरील विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून, ऑर्बिटरने या लँडरचे फोटो काढले आहेत. आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत’, अशी माहिती के. सिवन यांनी दिली.
देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील अखेरच्या टप्प्यात अचानक विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि उत्साहाने भरलेल्या इस्रोच्या मुख्यालयासह देशभरात निराशेचे मळभ पसरले होते. त्यानंतर पुढचे 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी शनिवारी म्हटले होते. विक्रम लँडर कुठे आहे याची माहिती दोन ते तीन दिवसांत मिळू शकते, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते.
या संपर्क तुटलेल्या लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑर्बिटरने त्याची छायाचित्रे टिपली आहेत, अशी माहिती के. सिवन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. ‘ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रे टिपली आहेत. अद्याप विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकला नाही, पण आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच संपर्क होईल’, असा विश्वासही सिवन यांनी या वेळी व्यक्त केला.
जगभरातून ‘इस्रो’चे कौतुक
नवी दिल्ली : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे चांद्रयान-2 चंद्रावर उतरू शकले नाही, पण इस्रोचे जगभरातून कौतुक होत आहे. अमेरिकेच्या नासा संस्थेने भारताची चांद्रयान 2 मोहीम आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करून भविष्यात अंतराळ क्षेत्रात इस्रोसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. याशिवाय संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन संस्थेनेही इस्रोची प्रशंसा केली आहे.