मुंबई : प्रतिनिधी
नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कायद्याला महाराष्ट्रात तुर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (दि. 11) पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये अनेक जाचक गोष्टींचा समावेश होता. वाहतूक नियम मोडणार्यास भरमसाठ आर्थिक दंडापासून ते शिक्षेपर्यंतच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. शिवाय वाहनचालकांना ड्रेसकोडही सक्तीचा करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांनीही गेल्याच आठवड्यात या कायद्याला विरोध दर्शविला होता. रावते म्हणाले, नव्या कायद्यानुसार वाढीव दंडाचा फेरविचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांचे या पत्राला उत्तर येत नाही तोपर्यंत या कायद्याचा अध्यादेश राज्यात लागू होणार नाही.