रोहे ः प्रतिनिधी
राजीव गांधी क्रीडा स्पर्धा अभियानअंतर्गत रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकताच रोहा तालुक्यातील धाटाव येथील तालुका क्रीडा संकुलात कला व क्रीडा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. त्यात कृषी विभागाचे रायगड जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माणगाव उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व खेळाडूंना खेळाची शपथ देऊन या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी के. टी. शिंदे, आत्मा कृषी संचालक सतिष बोर्हाडे, खोपोली उपविभागीय कृषी अधिकारी अर्चना सुळ, अलिबाग तंत्र अधिकारी रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी रोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी ग्रामदैवत श्री. धावीर महाराज, प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले व अर्थतज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांना अभिवादन करून संचलन केले. पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, कर्जत,उरण, तळा, खालापूर, सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग व पनवेल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही या संचलनात सहभागी झाले होते. क्रीडा महेात्सवात हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेनिस बॉल, गोळाफेक, लांबउडी, धावणे, बुद्धीबळ क्रीडाप्रकारात खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व विजेत्यांना कृषी अधिकारी शेळके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन रोहा कृषी अधिकारी एम. बी. करे यांनी केले.